ग्राहकांचे दावे निकाली काढण्यासाठी आणि विवाद सोडविण्यासाठी विमा कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग आणि डेटा अॅनालिटिक्सचा वापर करण्यात येत आहे. बनावट दावे शोधून काढण्यासोबतच कोणत्याही दाव्यामधील त्रुटी शोधून काढण्यात कंपन्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मोठी मदत होत आहे. दिवसेंदिवस कंपन्यांकडे येणाऱ्या दाव्यासाठी संख्या वाढत आहे. ग्राहकांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. फक्त कॉल सेंटरद्वारे समस्येचे निराकरण होत नसल्याने विमा क्षेत्रही येत्या काळात हाय टेक होत आहे.
खोटे दावे ओळखण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग -
कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करुन तयार केलेल्या अल्गोरिदमद्वारे ग्राहकांकडून किती वेळा विम्याचा दावा केला गेला, ग्राहकाची वैयक्तिक माहिती, क्लेम करताना ग्राहकाने दिलेला तपशील जसे की, आजाराची माहिती, कागदपत्रे हे खरे आहे की खोटे हे तपासणीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येत आहे. माहितीतून एक पॅटर्न शोधण्यात येतो आणि त्याचा निर्णय प्रक्रियेत वापर केला जातो. तंत्रज्ञानाच्या मदतीने कंपन्या कार्यक्षमता वाढवत आहेत. तसेच ग्राहकांना सेवा देण्यासाठी मनुष्यबळाची गरज कमी करण्याचा प्रयत्न कंपन्यांचा आहे.
डेटा अॅनालिटिक्स
विमा कंपन्यांकडे कोट्यवधी ग्राहकांची विविध प्रकारची माहिती असते. मात्र, ही सगळी महत्त्वाची तसेच त्यातील कमी महत्त्वाची माहिती कंपन्यांना फायद्याची ठरत नाही. त्यामुळे डेटा अॅनालिस्टिक्स, मशिन लर्निंग या तंत्रज्ञानाचा वापर करून कंपन्या यातून व्यवसाय वृद्धीसाठी महत्त्वाची माहिती मिळवत आहेत. ग्राहकांचे विमा संबंधित दावे निकाली काढताना वारंवार येणाऱ्या अडचणींना याद्वारे ट्रॅक केले जाते. तसेच त्यावर पर्याय शोधले जातात. इश्युरन्स क्षेत्रात डेटा अॅनलिटिक्स मोठ्या प्रमाणात रुढ होत आहे. कंपन्यांना कच्च्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी तंत्रज्ञांचीही गरज पडत आहे. अनेक कंपन्या बड्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना याबाबतच्या कामाची कंत्राटे देत आहेत.
ग्राहकांना सेवा देण्यासाठी स्मार्ट चॅटबॉट्स
अनेक विमा कंपन्यांकडून मनुष्यबळ कमी करून दीर्घकाळासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहकांना सेवा देण्यासाठी पर्यायी व्यवस्था तयार करत आहेत. विमा पॉलिसी खरेदी करण्याचा निर्णय घेणे, पॉलिसी खरेदी करणे, इतर बाबींसाठी सहाय्य करणे यासाठीही कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्यात येत आहे. ग्राहकाला उत्तर देण्यासाठी प्रत्येक वेळी ग्राहक सेवा प्रतिनिधी नव्हे तर मशिन चॅटबॉट अगदी व्यक्तीच्या आवाजात उत्तर देईल. फक्त किचकट प्रकरणांमध्येच कॉल ग्राहक सेवा प्रतिनिधीकडे हस्तांतरित केला जाईल. इतर दैनंदिन मदतीसाठी चॅटबॉट्स वापरण्याचा मानस कंपन्यांचा आहे. याद्वारे ग्राहकांची अडचणी सोडवण्यासाठी लागणारा वेळ करण्याचा प्रयत्न विमा कंपन्यांकडून करण्यात येत आहे.