Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Aeroflex Industries IPO: एरोफ्लेक्स इंडस्ट्रीजचा IPO येणार! अप्लाय करण्यापूर्वी कंपनीबद्दल या गोष्टी माहितीयेत का?

Aeroflex Industries IPO

Image Source : www.livemint.com/www.equitybulls.com

स्टेनलेस स्टीलसह विविध धातूपासूनची उत्पादने निर्मिती करणाऱ्या एरोफ्लेक्स कंपनीचा IPO मंगळवारी (22 ऑगस्ट) सबस्क्रिप्शनसाठी खुला होत आहे. IPO ला अप्लाय करण्यापूर्वी कंपनीची सर्व माहिती जाणून घ्या. 24 ऑगस्टपर्यंत अप्लाय करता येईल.

स्टेनलेस स्टीलसह विविध धातूंपासून उत्पादने निर्मिती करणाऱ्या एरोफ्लेक्स कंपनीचा IPO उद्या मंगळवारपासून (22 ऑगस्ट) सबस्क्रिप्शनसाठी खुला होत आहे. (Aeroflex Industries IPO) कंपनी भांडवली बाजारातून 351 कोटी रुपये उभारण्याच्या तयारी आहे. ऑगस्ट महिन्यात 10 पेक्षा जास्त कंपन्या IPO आणणार आहेत. तर चालू महिन्यातील हा पाचवा IPO आहे. 

कोणत्याही IPO ला अप्लाय करण्यापूर्वी कंपनीचा कुंडली पाहायला हवी. सखोल माहिती घेतल्याशिवाय गुंतवणूक जोखमीची ठरू शकते. या लेखात पाहूया एरोफ्लेक्स इंडस्ट्रीज नक्की काय करते? कोणत्या कारणासाठी कंपनी भांडवली बाजारातून पैसे उभारत आहे. 

IPO ची तारीख काय?

एरोफ्लेक्स कंपनीचा IPO 22 ऑगस्ट रोजी खुला होईल. 24 ऑगस्टपर्यंत बोली लावता येईल. 

शेअरचा प्राइज बँड (किंमत पट्टा) किती?

एका शेअरची किंमत 102 ते 108 रुपयांच्या दरम्यान असेल. 

IPO ची ऑफर काय आहे?

एरोफ्लेक्स सोल्युशन ही मुंबईतील स्टेनलेस स्टील उत्पादने निर्मिती करणारी कंपनी आहे. लवचिक पाइप, वायरिंग, कनेक्टर कंपनीकडून तयार करण्यात येतात. भांडवली बाजारातून कंपनी 351 कोटी रुपये उभारणार आहे. फ्रेश शेअरचे मूल्य 162 कोटी रुपये आहे. तर 1.75 कोटींचे शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) साठी आहेत.

IPO खुला होण्यापूर्वी कंपनीने संस्थात्मक गुंतणुकदारांकडून 76.14 कोटी रुपये उभारले आहेत. एकूण 86.9 लाख इक्विटी शेअर्स याद्वारे खरेदी झाले. विविध फंड हाऊस, कंपन्या आणि व्हेंचर कॅपिटल्ससोबत हा व्यवहार झाला. 

IPO आणण्यामागील उद्देश काय?

कंपनीला 31 कोटींचे कर्ज फेडायचे आहेत. तर कंपनीच्या भांडवलाच्या गरजेसाठी  84 कोटी रुपयांची गरज आहे. उर्वरित रक्कमही कॉर्पोरेट खर्चासाठी वापरण्यात येईल. व्यवसाय वाढीसाठीही काही रक्कम खर्च करण्यात येईल. 

लॉट साइझ किती असेल?

किरकोळ गुंतवणुकदारांना 130 शेअर्सच्या लॉटसाठी अप्लाय करता येईल. म्हणजेच कमीत कमी 14,040 रुपये गुंतवता येतील. जास्तीत जास्त असे 14 लॉट म्हणजेच 1,96,560 रुपयांच्या शेअर्ससाठी अप्लाय करता येईल. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती जास्तीत जास्त 71 लॉट खरेदी करू शकतो. 

कंपनीबद्दल अधिक माहिती?

मेटल, स्टेनलेस स्टीलचे लवचिक पाईप, गॅस होसेज कंपनीकडून तयार करण्यात येतात. कंपनी 80 पेक्षा जास्त देशांमध्ये आपली उत्पादने निर्यात करते. युरोप, अमेरिकेतही कंपनीची उत्पादने जातात. नवी मुंबईतील तळोजा MIDC मध्ये कंपनीचा निर्मिती प्रकल्प आहे. मागील आर्थिक वर्षात कंपनीने 723 ग्राहकांना (वेंडर) सेवा दिली. 

कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे?

आर्थिक वर्ष 2021 पासून कंपनीने वार्षिक 36 टक्के दराने महसुलात वाढ नोंदवली. तर याच कालावधीत नफा 124 टक्क्यांनी वाढून 30 कोटी रुपये झाला. डेट टू इक्विटी रेशो 0.39 इतका आहे. तर EBITDA वार्षिक 55.54 टक्क्यांनी वाढून 54.03 कोटी झाला. कंपनीच्या प्रमोटर्सकडे 91.90% शेअर्स आहेत. 

IPO तील जोखीम कोणत्या?

कंपनीच्या महसुलातील 80% वाटा निर्यातीचा आहे. तर 28% महसूल अमेरिकेतून येतो. कच्च्या मालासाठी कंपनी मोठ्या प्रमाणावर चीनवर अवलंबून आहे. कंपनीला कारभारासाठी भांडवलाची जास्त गरज लागते. 

मोठ्या उद्योगांसोबत कंपनीचा स्पर्धा आहे. मागील काही वर्षात कंपनीला पैशांची चणचण (कॅश फ्लो) जाणवली होती. कंपनीचा महसूल ठराविक मोठ्या ग्राहकांकडून येतो. त्यांच्याकडून खरेदी कमी झाल्यास कंपनीवर परिणाम होऊ शकतो. 

लिस्टिंग तारीख काय?

पात्र गुंतवणुकदारांच्या डिमॅट खात्यात 31 ऑगस्टला शेअर्स जमा होतील. तर अपात्र अर्जदारांना 30 ऑगस्टला पैसे माघारी मिळतील. 1 सप्टेंबरला शेअर NSE आणि BSE वर सूचीबद्ध होईल.