अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्य वधारण्यामागे कोणताही गैरव्यवहार झाल्याचा पुरावा आढळला नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केल्यानंतर शेअर मार्केटमध्ये त्याचे अपेक्षेप्रमाणे पडसाद उमटले. हिंडेनबर्ग प्रकरणानंतर होरपळून निघालेल्या अदानी ग्रुपमधील शेअर्सनी आज सोमवारी 22 मे 2023 रोजी जोरदार कमबॅक केला. चार महिन्यांत पहिल्यांदाच अदानींच्या सर्वच शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली. या तेजीने गुंतवणूकदारांनी किमान 80000 कोटींची कमाई केली.
सुप्रीम कोर्टाने अदानी समूहाला शेअर्सच्या किंमतींबाबत निर्माण झालेल्या संशयाला दूर केले आहे. ही क्लिनचीट मिळाल्यानंतर आज शेअर मार्केटमध्ये अदानी ग्रुपच्या सर्वच शेअर्समधील दैनंदिन उलाढाल वाढली.
अदानी ग्रुपमधील सर्वच्या सर्व 10 शेअर्समध्ये आज जबरदस्त तेजी दिसून आली. या ग्रुपमधील सर्वात महत्वाचा शेअर असलेल्या अदानी एंटरप्राईसेसमध्ये 19% वाढ झाली. निफ्टीवर अदानी एंटरप्राईसेसचा शेअर 2338.55 रुपयांवर गेला होता. त्याशिवाय अदानी विल्मरच्या शेअरमध्ये 10% वाढ झाली. तो 444.30 रुपयांवर गेला.
अदानी पोर्ट अॅंड एसईझेड या शेअर्समध्ये आज 6% वाढ झाली. बाजार बंद होताना अदानी पोर्टचा शेअर 729.65 रुपयांवर स्थिरावला. सिमेंट उद्योगातील अंबुजा सिमेंट आणि एसीसी सिमेंट या दोन्ही कंपन्याच्या शेअर्समध्ये आज वाढ झाली. अंबुजा सिमेंटचा शेअर आज 5% वाढ झाली आणि तो 423.60 रुपयांवर बंद झाला. एसीसी या कंपनीच्या शेअरमध्ये आज 4.93% ने वधारुन 1814.80 रुपयांवर बंद झाला.
अदानी पॉवरचा शेअर आज 5% ने वधारला आणि तो 248 रुपयांवर गेला. आजच्या सत्रात त्याला अप्पर सर्किट लागले होते. अदानी ट्रान्समिशनचा शेअर देखील आज तेजीत होता. बाजार बंद होताना अदानी ट्रान्समिशनचा शेअर 825.35 रुपयांवर बंद झाला.
अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरला आज अप्पर सर्किट लागले. अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 5% वधारुन 942.40 रुपयांवर बंद झाला. अदानी टोटल गॅसचा शेअर 721.35 रुपयांवर बंद झाला. त्यात 5% वाढ झाला. काही महिन्यांपूर्वी अदानी ग्रुपने एनडीटीव्ही ही कंपनी खरेदी केली होती. आज एनडीटीव्हीचा शेअर 4.98% ने वधारला आणि 186.45 रुपयांवर स्थिरावला.
सुप्रीम कोर्टात काय झाले
- अदानी समूहाकडे परदेशी संस्थांकडून आलेल्या पैशांमुळे कायद्याचे उल्लंघन झाल्याच्या आरोपाबद्दल ‘सेबी’च्या चौकशीतून काहीही आढळले नसल्याचेही समितीने म्हटले आहे.
- सर्वोच्च न्यायालयाने नियामक चौकट तपासण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीने सर्वोच्च न्यायालयाला ६ मे रोजी अहवाल सादर केला होता.
- त्यावर शुक्रवारी 19 मे 2023 रोजी सुप्रीम कोर्टात निर्णय जाहीर करण्यात आला. ‘
- ‘हिंडेनबर्ग अहवालाआधी आणि नंतर अदानी समूहातील शेअर्समध्ये काही बड्या गुंतवणूकदारांनी नफेखोरी केल्याचे आरोप होते.
- ‘सेबी’ने दिलेले स्पष्टीकरण, आकडेवारी यांचा विचार करता सेबीला अपयश आले, असा निष्कर्ष काढणे अशक्य आहे.
- ‘सेबी’ने स्वीकारलेल्या निमयावलीनुसार, स्पष्ट आणि सातत्यपूर्ण धोरणाची भविष्यात आवश्यकता आहे’’, असे समितीने अहवालात नमूद केले.
- सर्वोच्च न्यायालयाने ‘सेबी’ला अदानी समूहाविरुद्धच्या आरोपांची चौकशी पूर्ण करण्यासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून दिली.
- सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. एम. सप्रे यांच्या नेतृत्वाखालील या तज्ज्ञ समितीमध्ये ओ. पी. भट्ट, के. व्ही. कामथ हे अनुभवी बँकप्रमुख, इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी आणि सोमशेखर सुंदरेसन यांचा समावेश होता.