कोळसा, वीज निर्मिती, हवाई सेवा, एफएमसीजी, टेलिकॉम, मिडीया या उद्योगांबरोबच आता अदानी समूहाने रेल्वेच्या ऑनलाईन तिकिट बुकिंगमध्ये प्रवेश केला आहे. अदानी ग्रुपमधील अदानी डिजिटल लॅब या कंपनीने 'ट्रेनमन अॅप'वर ताबा मिळवला आहे. यामुळे सरकारी कंपनी IRCTC ला धोका निर्माण झाल्याचे बोलले जाते. रेल्वेच्या ऑनलाईन तिकिट बुकिंगवर सध्या केंद्र सरकारच्या IRCTC कंपनीचे वर्चस्व आहे. अदानी यांच्या प्रवेशाने मात्र राजकारण तापले आहे. विरोधी पक्षाने या मुद्द्यावर सरकारवर टीका केली. (Adani Group Acquired Trainman App)
अदानी डिजिटल लॅब या अदानी ग्रुपमधील उपकंपनीने स्टार्क एंटरप्राईस (Stark Enterprises) या कंपनीची 100 % हिस्सेदारी खरेदी केल्याचे नुकताच जाहीर केले. हा व्यवहार किती कोटींचा झाला याची माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे. स्टार्क एंटरप्राईसेस ही रेल्वेची ऑनलाईन तिकिट बुकिंग प्लॅटफॉर्म 'ट्रेनमन अॅप' ची मुख्य कंपनी आहे. आता 'ट्रेनमन अॅप'वर थेट अदानी समूहाची मालकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
देशात दररोज 1.45 लाख तिकिटे ऑनलाईन बुक होतात. यात सर्वात जास्त तिकिटांचे बुकिंग IRCTC च्या वेबसाईट आणि अॅपवरुन होते. 'ट्रेनमन अॅप'चा दैनंदिन तिकिट बुकिंगमध्ये केवळ 0.13% इतका वाटा असल्याचे आयआरसीटीसीने म्हटले आहे. दैनंदिन तिकिट बुकिंगमध्ये तूर्त 'ट्रेनमन अॅप'चा वाटा नगण्य असला तरी भविष्यात IRCTC च्या वर्चस्वाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
विरोधी पक्षांनी अदानी समूहाने रेल्वे तिकिट बुकिंगमध्ये प्रवेश केल्याने सरकारवर टीका केली आहे. त्यावर आज आयआरसीटीसी कंपनीने शेअर मार्केटला 'स्टार्क एंटरप्राईसेस आणि ट्रेनमन अॅप' च्या व्यवहारावर माहिती दिली आहे. IRCTC ने शेअर बाजाराला कळवले आहे की ट्रेनमन अॅपची अदानी समूहाने खरेदी केली तर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. रेल्वे ऑनलाईन तिकिट बुकिंगमध्ये IRCTC चे देशभरात 32 बिझनेस पार्टनर आहेत. त्यात ट्रेनमन अॅपचा देखील समावेश आहे. सध्या ट्रेनमन अॅपमधून होणाऱ्या ऑनलाईन तिकिट बुकिंगचे प्रमाण खूपच कमी असल्याचे ही कंपनी स्पर्धा करेल, असे समजणे तूर्त चुकीचे असल्याचे IRCTC ने निवेदनात म्हटले आहे.
विरोधी पक्षाची सरकारवर टीका
अदानी ग्रुपने ट्रेनमन अॅप' खरेदी केल्यानंतर कॉंग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली आहे. अदानी ग्रुपने 'ट्रेनमन अॅप' ला खरेदी करणे म्हणजे IRCTC वर ताबा मिळवण्याच्या दृष्टीने केलेली सुरवात आहे, अशी टीका कॉंग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी केली. ते म्हणाले की अदानी ग्रुप आणि ट्रेनमन अॅपमधील व्यवहाराला रेल्वे मंत्रालयाने नकार दिला होता असा दावा रमेश यांनी केला. ट्रेनमन अॅप ही IRCTC च्या 32 बिझनेस पार्टनर्सपैकी एक कंपनी आहे. अदानींनी बिझनेस पार्टनर खरेदी करुन थेट IRCTC शी स्पर्धा करण्याचे नियोजन केले आहे. यातून IRCTC ला कमकुवत केले जाईल आणि नंतर IRCTC वर ताबा मिळवला जाईल, असा गंभीर आरोप जयराम रमेश यांनी केला आहे.
ट्रेनमन अॅप 12 वर्ष जुनी कंपनी
आयआयटी रुरकीचे ग्रॅज्युएट विनित चिरानिया आणि करन कुमार यांनी रेल्वे तिकिटांचे ऑनलाईन बुकिंग आणि रेल्वेची माहिती देणारे ट्रेनमन अॅप 2011 मध्ये विकसित केले होते. रेल्वे प्रवासासंबधी माहिती, पीएनआर स्टेटस ट्रेनमन अॅपवर चेक करता येतो. ट्रेनमन अॅपची मुख्य कंपनी स्टार्क एंटरप्राईस (Stark Enterprises) ही स्टार्टअप आहे. याच स्टार्टअपवर आता अदानी ग्रुपमधील अदानी डिजिटल लॅब या कंपनीने ताबा मिळवला आहे.