अदानी समुहातील अदानी इंटरप्रायजेस आणि अदानी ट्रान्समिशन (Adani Enterprises & Adani Transmission) या दोन कंपन्यांनी पात्र संस्थात्मक प्लेसमेंट (Qualified Institutional Placement-QIP) द्वारे 21,000 कोटी रुपये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 12,500 कोटी रुपये अदानी इंटरप्रायजेस तर उर्वरित 8,500 कोटी रुपये अदानी ट्रान्समिशन कंपनी उभारणार आहे.
अदानी ग्रुपमधील या दोन्ही कंपन्यांनी आपल्या बोर्ड मिटिंगनंतर वेगवेगळ्या पद्धतीने QIP अंतर्गत निधी जमा करण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे जमा केली जाणर आहेत. दरम्यान, अदानी समुहातील आणखी एक कंपनी अदानी ग्रीन एनर्जी (Adani Green Energy) कंपनीने निधी जमा करण्यासाठी शनिवारी (दि. 13 मे) बैठक आयोजित केली होती. पण कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने ही बैठक 24 मे पर्यंत पुढे ढकलली आहे.
पात्र संस्थात्मक प्लेसमेंट म्हणजे काय?
पात्र संस्थात्मक प्लेसमेंट (Qualified Institutional Placement-QIP) ही एक अशी प्रक्रिया आहे; ज्याद्वारे एक लिस्टेड झालेली कंपनी इक्विटी शेअर्स प्रमाणेच पूर्णत: किंवा काही प्रमाणात डिबेंचर्स आणि सिक्युरिटीज इश्यू करू शकते.
अदानी समुहातील या कंपन्यांनी निधी जमा करण्यासाठी घेतलेल्या निर्णयानुसार एकूणच अदानी समुहाच्या कर्ज फेडण्याच्या क्षमतेवरील प्रश्नचिन्हाला विराम मिळण्याची शक्यत वर्तवली जात आहे. तसेच यामुळे गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.
अमेरिकेतील हिंडेनबर्ग संस्थेने अदानी समुहाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत, एकूणच समुहातील गडबड घोटाळ्यावर भाष्य केले होते. त्यावेळी अदानी ग्रुपमधील अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार घसरण झाली होती. यामुळे गौतम अदानी यांचे जागतिक पातळीवरील अब्जाधीशांच्या यादीतून नाव खाली आले होते. त्यावेळी गौतम अदानी यांनी हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे आमच्या व्यवसायावर कोणताच परिणाम होणार नाही, असे म्हटले होते. पण अदानी समुहातील अनेक कंपन्यांना याचा फटका सहन करावा लागला होता.
अदानी ग्रुपने यापूर्वी मार्चमध्ये अमेरिकेतील गुंतवणूक फर्म GQG ला काही कंपन्यांमधील भागीदारी विकून 1.9 अब्ज डॉलर मिळवले होते. त्याचबरोबर ग्रुपने जाणीवपूर्वक कंपन्यांवरील कर्ज मुदतीपूर्वी फेडत असल्याचा विश्वास निर्माण करून, हिंडेनबर्गच्या आरोपामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आताही अदानी ग्रुप अशावेळी आपल्या कंपन्यांच्या माध्यमातून निधी गोळा करत आहे. ज्यावेळी हिंडेनबर्गच्या आरोपांची दखल घेत स्थापन केलेल्या कमिटीने आणि सेबीने अदानी ग्रुपची चौकशी करण्यास सुरूवात केली आहे.