उद्योगासाठी भांडवल नसलेल्या भावी उद्योजकांना केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) या योजनेमार्फत निधी पुरवला जात आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत बँका आणि वित्तीय संस्थांनी 40.82 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना 23.2 लाख कोटी रुपये मंजूर केले आहेत. वित्त मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, (PMMY) या योजनेत देशातील बँका व वित्तीय संस्था भांडवल पुरवत आहे आणि त्यांच्याद्वारेच हे भांडवल वितरित केले जात आहे. योजनेच्या 8 व्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू झाल्यापासून, मार्च 2023 पर्यंत 40.82 कोटी खात्यांमध्ये सुमारे 23.2 लाख कोटींचे कर्ज रुपये मंजूर करण्यात आले आहे”. या योजनेतील सुमारे 68% खाती ही महिला उद्योजकांची आहेत आणि 51% खाती SC/ST आणि OBC प्रवर्गातील उद्योजकांची आहेत. देशातील नवोदित उद्योजकांना कर्जाची सहज उपलब्धता हे नवनवीन शोध आणि दरडोई उत्पन्नात स्थायी वाढ करण्यास कारणीभूत असल्याचे यावरून दिसून येते, असेही त्या म्हणाल्या.
सूक्ष्म व लघु उद्योगांनी 'मेक इन इंडिया' या उपक्रमात मोठे योगदान दिले आहे. या योजनेमुळे देशातील उत्पादन क्षमता वाढली आहे. तसेच तळागळातील उद्योगांमध्ये केलेले विविध प्रयोग देशासाठी फायदेशीर ठरत आहेत. वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी PMMY योजनेमुळे देशातील सूक्ष्म-उद्योगांना पुढील काळात चालना मिळेल, अशी आशा व्यक्त केली.
प्रधानमंत्री मुद्रा योजना (Pradhan Mantri Mudra Yojana)
बँक ग्रामीण, शहरी आणि महानगर भागातील लघु व्यवसायांना या योजनेद्वारे वित्तपुरवठा करते. कर्जाच्या रकमेच्या आधारावर मुद्रा कर्जाचे तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाते.
- शिशू गटाद्वारे 50,000 रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते
- किशोर गटातून 50,000 ते 5 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते
- तरुण गटामधून 5 लाख ते 10 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते