Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

2020-21 मध्ये भारतीयांकडून 23 हजार कोटी रुपये दान; मध्यमवर्गीयांकडून सर्वाधिक मदतीचा ओघ!

2020-21 मध्ये भारतीयांकडून 23 हजार कोटी रुपये दान; मध्यमवर्गीयांकडून सर्वाधिक मदतीचा ओघ!

अशोका युनिव्हर्सिटी आणि जागतिक पातळीवरील संशोधन संस्था कंतार या संस्थांनी संयुक्तरीत्या केलेल्या सर्वेक्षण अहवालात स्पष्ट. भिकाऱ्यांना सर्वाधिक 12,900 कोटी रुपयांचे दान तर धार्मिक संस्था तिसऱ्या क्रमांकावर.

भारतातील ग्रामीण आणि शहरी भागातील मध्यमवर्गीयांनी 2020-21 या वर्षात सर्वाधिक रोख रकमेत दान दिल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक दान हे धार्मिक संस्था आणि भिकाऱ्यांना देण्यात आले, असे अशोक विद्यापीठाने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले.

मध्यमवर्गीय कुटुंबांकडून सर्वाधिक दान!

जागतिक पातळीवरील संशोधन संस्था कंतार आणि अशोका विद्यापीठ यांनी एकत्रितरीत्या ‘हाऊ इंडिया गिव्हस 2020-2021’ (How India Gives 2020-2021) यावर सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणातून 2020-2021 या वर्षात एकूण 23,700 कोटी रुपये समाजातील घटकांनी दान म्हणून दिल्याचे या सर्वेक्षणातून सामोरे आले. रोख रकमेत आर्थिक मदत म्हणून दान करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे 44 टक्के लोक मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. या सर्वेक्षणातील हा सर्वांत मोठा आकडा असल्याचे सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेचे म्हणणे आहे.

धार्मिक संस्थांना सर्वाधिक मदतीचा ओघ!

साधारणत: भारतीय संस्कृतीमध्ये एखाद्याला मदत करणं हे मोठं कर्म मानलं जातं. त्यामुळे भारतातील सर्व धर्मियांचे लोक आपापल्यापरीने मदत करत असतात. या सर्वेक्षणात असेही आढळून आले आहे की, 2020-2021 मध्ये सर्वाधिक मदत ही धार्मिक संस्थांना मिळाली. या संस्थांना 16,600 कोटी रुपयांची मदत रोख रकमेत मिळाली. त्यानंतर भिकाऱ्यांना 12,900 कोटी रुपयांची रोख मदत मिळाली.

अधार्मिक संस्था तिसऱ्या क्रमांकावर!

अधार्मिक संस्थांमध्ये एनजीओ (Non-Governmental organization), पीएम केअर फंड (PM Care Fund) आणि हॉस्पिटल्स (Hospitals) यांचा रोख मदत मिळण्याच्या क्रमवारीत तिसरा क्रमांक लागतो. या संस्थांना 1.1 हजार कोटी रुपये मदत मिळाली.

18 राज्यातील 81 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण 

कंतार संस्था आणि अशोका विद्यापीठ यांनी एकत्रितरीत्या ‘हाऊ इंडिया गिव्हस 2020-2021’ (How India Gives 2020-2021) सर्वेक्षणात भारतातील 18 राज्यातील 81 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण केले. हे सर्वेक्षण ऑक्टोबर 2020 आणि सप्टेंबर 2021 या कालावधीत करण्यात आले होते. सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या घटकांना गेल्या 6 महिन्यात कुटुंब म्हणून किंवा वैयक्तिक व्यक्ती म्हणून मदत केली का? आणि केली असेल तर कोणाला केली? अशी माहिती विचारण्यात आली होती.

या सर्वेक्षणातून भारतातील कुटुंबियांच्या पद्धती, त्यांचे सामाजिक-आर्थिक गट, भौगोलिक स्थिती प्रामुख्याने विचार करण्यात आला आणि यातून भारतीयांचे राष्ट्रीय पातळीवर सर्वसमावेश चित्र समजून घेण्यास मदत झाल्याचे सर्व्हे करणाऱ्या संस्थेचे म्हणणे आहे.

सर्वाधिक मदत समाजातील कोणत्या घटकांकडून?

सर्वेक्षणामधून समोर आलेल्या माहितीनुसार, सर्वांत कमी उत्पन्न असलेल्या कॅटेगरीतील लोकांकडून सर्वाधिक म्हणजे 52 टक्के मदत करण्यात आली. तर अधिक उत्पन्न असलेल्या कॅटेगरीतील लोकांकडून 22 टक्के मदत मिळाल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले. यामध्ये असेही आढळून आले आहे की, 46 ते 60 वयोगटातील लोकांकडून अधिक मदत देण्यात आली. अधिक खोलात जाऊन सांगायचे झाले तर पुरुषांकडून ओळखीतील कुटुंबं-मित्र परिवार आणि धार्मिक संस्थांना सर्वाधिक मदत देण्यात आली. तर महिलांनी कुटुंबाशी संबंधित सदस्य आणि भिकाऱ्यांना मदत केली. तसेच शहरी कुटुंबांपेक्षा ग्रामीण भागातील कुटुंबांकडून सर्वाधिक 88 टक्के मदत तर शहरी कुटुंबांकडून 83 मदत केल्याचे, सर्वेक्षण अहवालात म्हटले.

धार्मिक संस्थांना मदत किंवा दान करणं हे भारतातील बऱ्याच कुटुंबांची परंपरा असल्याचे किंवा ते धार्मिक गोष्टींना अधिक प्राधान्य देत असल्याचे या सर्वेक्षणातून सामोर आले.