New Demat Account: मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. जून महिन्यात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 65 हजार अंकांच्याही पुढे गेला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 19,500 अंकांच्याही पुढे जाऊन आला. शेअर बाजारात मोठ्या घडामोडी होत असताना नवखे गुंतवणूकदार डीमॅट खाते उघडण्यात व्यग्र होते. जूनमध्ये मागील 13 महिन्यातील सर्वाधिक म्हणजेच 23 लाख डिमॅट खाती नव्याने उघडण्यात आली.
13 महिन्यातील उच्चांक
बाजार सुस्थितीत असल्याने शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामध्ये जुन्या गुंतवणुकदारांसोबत नवे गुंतवणूकदारही उत्सुक आहेत. Central Depository Service आणि National Securities Depository ने नव्या डिमॅट खातेधारकांची आकडेवारी नुकतीच जाहीर केली. जून महिन्यात बाजार सर्वाधिक तेजीत असताना 2.36 मिलियन म्हणजेच सुमारे 23 लाख नवी डिमॅट खाती सुरू झाली.
याआधी मे 2022 मध्ये सर्वाधिक डिमॅट खाती उघडली गेली होती. त्यानंतर मे 2023 मध्ये 21 लाख डिमॅट खाती नव्याने सुरू झाली होती. मात्र, जून महिन्याने मागील सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले.
देशात एकूण डिमॅट खाती किती?
देशात 12 कोटींपेक्षा जास्त डिमॅट अकाउंट आहेत. मागील वर्षभरात यामध्ये 24 टक्क्यांची वाढ झाली. तर एकट्या जून महिन्यात 2 टक्क्यांनी खात्यांची संख्या वाढली. जून तिमाहीत भांडवली बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. 28 मार्च 2023 नंतर निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांक सुमारे 15 टक्क्यांनी वाढले. मिड कॅप, स्मॉल कॅपसह इतर क्षेत्रीय इंडेक्सनेही चांगली प्रगती केली. जून तिमाहीत भांडवली बाजारातील एकूण व्यवहारांची किंमत, ट्रेडिंग ऑर्डर, नवे गुंतवणूकदार वाढले. या सर्व गोष्टींचा भांडवली बाजारावर सकारात्मक परिणाम झाला.
IPO ला गुंतवणूकदारांचा भरभरून प्रतिसाद
जून महिन्यात प्रतिदिन सरासरी 67,491 कोटी रुपयांचे व्यवहार झाले. मागील वर्षाच्या तुलनेत ही व्यवहारांची संख्या 42% जास्त आहे. तर डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये सरासरी 259 लाख कोटी रुपये किंमतीचे प्रतिदिन व्यवहार झाले. मागील काही महिन्यांपासून IPO ला गुंतवणुकदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच तरुणांमध्ये आर्थिक साक्षरता वाढत आहे. उत्पन्न वाढत असल्याने बचतही वाढत आहे. त्यामुळे नव्या डिमॅट खात्यांची संख्या वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.