झी एंटरटेनमेंटचे शेअर्स मागील सत्रात सुमारे 4 टक्क्यांनी खाली होते. त्यात आज सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर सुरूवातीच्या टप्प्प्यातच त्यात 5.4 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली. या वर्षभरात झी एंटरटेनमेंटचे शेअर्स जवळजवळ 20 टक्क्यांनी घसरले आहेत.
झी चे मुख्य कार्यकारी पुनित गोयंका यांनी गुरूवारी त्यांच्या कंपनीविरोधात सुरू केलेल्या दिवळाखोरीच्या कारवाईबाबत नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे अपील केले आहे. दरम्यान, कंपनीने जपानमधील सोनी ग्रुप ऑफ कंपनीसोबत झी चे विलिनीकरण करण्यावरही भर दिला आहे. तसेच हे विलिनीकरण लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी कंपनीला खात्री आहे.
झी कंपनीच्या दिवाळखोरी प्रकरणात वेळखाऊ प्रक्रिया राबवली जात असल्याचे मत अनेक माध्यम तज्ज्ञांनी व्यक्त केले. या प्रक्रियेला असाच वेळ लागला तर झी-सोनी यांच्या विलिनीकरणातून 10 अब्ज मिडिया पॉवरहाऊस भारतात तयार होतील, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान नॅशनल स्टॉक एक्सचेंजने गुरूवारी (दि. 23 फेब्रुवारी) झी कंपनीच्या शेअर्सवर डेरिव्हेटीव्ह ट्रेडिंग करण्यास 28 एप्रिलपासून बंदी घातली आहे. पुनित गोयंका यांनी गुरूवारी (दि. 23 फेब्रुवारी) नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडे अपील केले होते. त्यावर आज शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
डेरिव्हेटिव्हज् ट्रेडिंग म्हणजे काय?
सर्वप्रथम आपण डेरिव्हेटिव्हज् म्हणजे काय? ते जाणून घेऊ. डेरिव्हेटिव्ह ही अशी गोष्ट आहे; जी दुसऱ्या एका स्त्रोतावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, साखर ही ऊसापासून मिळते. तर यात साखर ही ऊसाची डेरिव्हेटिव्ह आहे.
डेरिव्हेटिव्हज् ट्रेडिंग ही दोन किंवा त्यापेक्षा अधिक लोकांमध्ये केली जाणारी ट्रेडिंगची पद्धत आहे. या ट्रेडिंगमध्ये विक्रेता आणि खरेदीदार यांच्यात एक सामंजस्य करार होत असतो. त्या करारनुसार शेअर्सची आणि पैशांची डिलेव्हरी केली जाते. तसेच यातील मुख्य गोष्ट म्हणजे त्याची खरेदी कोणत्या किमतीत केली जाणार हे कराराच्या दिवशी किंवा करारानुसारच ठरते. भारतीय शेअर मार्केटमध्ये डेरिव्हेटिव्हज मार्केटचे चार प्रमुख प्रकार पडतात. त्यात फॉरवर्ड डेरिव्हेटिव्हज् ट्रेडिंग, फ्युचर ट्रेडिंग, ऑप्शन ट्रेडिंग आणि स्वॅप डेरिव्हेटिव्हज.
झीच्या तिमाही निकालानंतरही शेअर्समध्ये घसरण
झी एंटरटेनमेंट इंटरप्रायझेस कंपनीच्या डिसेंबरच्या तिमाही अहवालामध्ये कंपनीच्या नफ्यात सुमारे 91 टक्क्यांची घसरण झाली होती. त्यावेळी सुद्धा झीच्या शेअर्समध्ये 4 टक्क्यांची घसरण झाली होती. जाहीरातीतून मिळणाऱ्या नफ्यात कमतरता झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यात कंपनीवरील कर्जाचे देणे वाढतच आहे. परिणामी कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होत आहे.