Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बँकेतील लॉकरचा देखील उतरवू शकता विमा, ही आहे प्रक्रिया!

बँकेतील लॉकरचा देखील उतरवू शकता विमा, ही आहे प्रक्रिया!

बँकेच्या लॉकरमध्ये ग्राहकाने ठेवलेल्या वस्तूंपैकी काही वस्तू गहाळ झाल्या किंवा चोरीला गेल्या तर त्याची नुकसान भरपाई कशी मिळू शकते. याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत.

सध्या चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वर्तमानपत्र वाचायला गेलो तर अर्ध्यापेक्षा अधिक बातम्या या चोरी, दरोडा यांच्याविषयीच असतात. त्यामुळे प्रत्येकजण आपल्याकडे असलेल्या मालमत्तेची काळजी घेतो. सोन्याचे भाव तर दिवसेंदिवस गगनाला भिडलेले आहेत आणि त्यामुळे सोन्याची तर प्रचंड काळजी घ्यावी लागते. सोन्याचे मंगळसूत्र, चैन यांच्या चोरीबाबत तर आपल्याला रोजच ऐकायला मिळते. त्यामुळे सध्या अनेकजण सोन्याचे दागिने घालून मिरवण्यापेक्षा ते दागिने लॉकरमध्ये ठेवणे पसंत करतात. सोन्याच्या दागिन्यांसोबतच अनेक मौल्यवान कागदपत्रे देखील लॉकरमध्ये ठेवली जातात. घरात चोरी झाल्यास आपल्या या मौल्यवान गोष्टी सुरक्षित राहाव्यात, असा त्यामागे उद्देश असतो.

बॅंकेचे लॉकर सुरक्षित असते?
बँकेतले तुमचे लॉकर हे सुरक्षितच आहे असे तुम्हाला वाटत असते. पण काही ठिकाणी लॉकर फोडून लोकांचे दागिने चोरले गेले असल्याची प्रकरणं देखील घडलेली आहेत. बँकेच्या लॉकरमध्ये ग्राहकाने ठेवलेल्या वस्तूंपैकी काही वस्तू गहाळ झाल्या किंवा चोरीला गेल्या तर बँक नुकसानभरपाई देण्यास जबाबदार असते का? हा प्रश्न लोकांना नेहमीच पडतो. या प्रश्नाचेच उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. तुमच्या बँकेच्या लॉकरमध्ये असलेल्या वस्तूंसाठी तुम्ही तुमच्या लॉकरचा देखील विमा उतरवू शकता.

विमा कशाप्रकारे उतरावा?
आरोग्य, जीवन, गाडीचा विमा उतरवता येतो हे तुम्ही आजवर ऐकले होते. पण आज आम्ही तुम्हाला एका वेगळ्या प्रकारच्या विम्याविषयी सांगणार आहोत. या विम्यांप्रमाणेच तुम्हाला तुमच्या बॅंक लॉकरचा देखील विमा उतरवता येतो. IFFCO Tokio जनरल इन्सुरन्स कंपनीद्वारे तुम्हाला हा विमा उतरवता येतो. ही भारतातील सगळ्यात पहिली विमा कंपनी आहे, जी तुमच्या बँकेतील लॉकरमध्ये असणाऱ्या मौल्यवान वस्तुंना सुरक्षा पुरवते.

आजवर अनेक बँकांमध्ये लोकांच्या वस्तू चोरीला गेल्याचे ऐकायला मिळाले आहे. त्यामुळेच IFFCO Tokio ही इन्सुरन्स कंपनी एका आगळीवेगळी संकल्पना घेऊन आली आहे. केवळ हा विमा उतरवताना तुमच्या लॉकरमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत याबाबत सांगणे गरजेचे आहे. तुम्ही विमा उतरवताना ज्या ज्या गोष्टींविषयी सांगितले आहे, त्याच गोष्टीबाबत तुम्हाला सुरक्षा मिळते.

मुंबईत काही वर्षांपूर्वी एका बँकेत भुयारमार्ग बनवण्यात आला होता आणि त्याद्वारे लोकांच्या लॉकरमधील सगळे दागिने चोरण्यात आले होते. केवळ मुंबईत नव्हे तर आजवर देशभरात अशा अनेक घटना घडल्या आहेत आणि त्याचमुळे IFFCO Tokio या कंपनीने बँक लॉकर प्रोटेक्शन पॉलिसी आणली आहे. तुमच्या मौल्यवान वस्तू बँकेत असेपर्यंत तुम्हाला या पॉलिसीअंतर्गत सुरक्षा मिळते. तुम्हाला बँकेत असलेल्या वस्तूवर तीन लाखांपासून ४० लाखापर्यंत कव्हर मिळतो. विविध मुल्यांसाठी तुम्हाला विविध रकमेचा प्रीमियम भरावा लागतो. 3 लाखांपासून तुम्ही कितीही किमतीपर्यंतचा विमा उतरवू शकता.

हा विमा उतरवताना केवळ तुमच्याकडे असलेल्या मौल्यवान वस्तुंची यादी तुम्हाला इन्श्युरन्स कंपनीला द्यावी लागते. हा विमा उतरवताना या वस्तुंची किंमत किती आहे याबाबत कोणतीही माहिती देण्याची गरज तुम्हाला नसते. केवळ तुम्ही 40 लाखांहून अधिक किमतीचा विमा उतरवणार असाल तर तुम्हाला तुमच्या वस्तूंचे मूल्यांकन करावे लागते. हे मूल्यांकन इन्सुरन्स कंपनीद्वारे केले जाते.

तुम्ही विमा उतरवला की, केवळ वस्तूंची चोरी झाली किंवा त्या गहाळ झाल्या तरच तुम्हाला विम्याचे पैसे मिळतात असे अनेकांना वाटते. पण असे नाही. बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून तुमच्या वस्तूंचे नुकसान झाल्यास, आतंकवादी हल्ला झाल्यास, बँकेत चोरी झाल्यास, बँकेवर दरोडा पडल्यावरही तुम्हाला या विम्याद्वारे पैसे मिळू शकतात.

कोणकोणत्या वस्तू विम्यात कव्हर होतात?
केवळ सोने-चांदी आणि हिऱ्याच्या वस्तुंची चोरी किंवा त्याचे नुकसान झाल्यावरच विमा सुरक्षा मिळते असे नाही. तर तुमच्या लॉकरमध्ये असलेली घराची, गाडीची कागदपत्रे, पासपोर्ट, इन्सुरन्स पॉलिसी तसेच शेअर सर्टिफिकेट या गोष्टी देखील विम्याअंतर्गत कव्हर केल्या जातात. पण हा विमा उतरवताना तुम्ही कोणतीही चुकीची माहिती दिल्यास कंपनी तुमचा विमा रद्द करू शकते. यासाठी कंपनी तुम्हाला तुमची बाजू मांडण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी देते. त्यामुळे बँक लॉकर प्रोटेक्शन पॉलिसी घेताना आपल्या लॉकरमध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत, याबाबत बँकेला सांगणे गरजेचे आहे. लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तुंचा विमा उतवण्यासाठी हे लॉकर बँकेचे असणे आवश्यक आहे. कोणत्याही खाजगी जागेत ठेवलेल्या लॉकरचा विमा काढता येत नाही.