यथार्थ हॉस्पिटल अॅंड ट्रॉमा केअर सर्व्हिसेस या कंपनीचा शेअर आज सोमवारी 7 ऑगस्ट 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. यथार्थ हॉस्पिटलच्या शेअरने इश्यू प्राईसच्या तुलनेत अवघी 2% वाढ घेत 306.10 रुपयांवर लिस्ट झाला. या सुमार कामगिरीने गुंतवणूकदारांची सपशेल निराशा झाला.
यथार्थ हॉस्पिटलच्या समभाग विक्री योजनेला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला होता. कंपनीच्या शेअर खरेदीसाठी 26 ते 28 जुलै 2023 या दरम्यान अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली होती. आयपीओसाठी कंपनीने प्रती शेअर 285 ते 300 रुपयांचा किंमत पट्टा निश्चित करण्यात आला होता.
कंपनीचा आयपीओ एकूण 37.28 पटीने सबस्क्राईब झाला होता. क्वालिफाईड बिडर्ससाठीचा राखीव हिस्सा 86.37 पटीने आणि बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा 38.62 पटीने सबस्क्राईब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 8.66 पटीने सबस्क्रिप्शन मिळाले होते.
आयपीओ योजनेला मिळालेला प्रतिसाद पाहता ग्रे मार्केटमध्ये देखील यथार्थ हॉस्पिटलचा शेअर तेजीत होता. ग्रे मार्केटमध्ये यथार्थ हॉस्पिटलाचा शेअर 25% प्रीमियमसह ट्रेड करत होता. शेअर इश्यू प्राईसच्या 70 ते 75 रुपये अधिक दराने ट्रेड करत होता.
ग्रे मार्केटमधील प्रीमियम वाढल्याने लिस्टींगमधून चांगला नफा होईल असा अंदाज ब्रोकर्सनी व्यक्त केला. मात्र आज प्रत्यक्षात यथार्थ हॉस्पिटलच्या शेअरने गुंतवणूकदारांना निराश केले.
मुंबई शेअर बाजारात यथार्थ हॉस्पिटलचा शेअर 306.10 रुपयांवर लिस्ट झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात यथार्थ हॉस्पिटलने 304 रुपयांच्या स्तरावर पदार्पण केले. आयपीओमध्ये शेअर प्राप्त झालेल्या गुंतवणूदाकांराना अवघा 1% फायदा झाला.