मोठ्या पगाराच्या किंवा किंवा मॅनेजमेंट पातळीवरील पदावर पुरुषांपेक्षा महिलांची संख्या कमी का असते, याचा आढावा एका अभ्यासामधून घेण्यात आला आहे. या अभ्यासातून बहुतांश अश्चर्यकारक उत्तरे उघडकीस आली आहेत. जसे की पुरुषांच्या तुलनेत महिला कमी जोखीम घेतात. कमी जोखीम घेण्यामागे महिलांचा दृष्टिकोन काय असतो? अशा प्रश्नांची उत्तरे या अभ्यासातून शोधण्यात आली आहेत.
पुरुषांच्या तुलनेत महिला कमी जोखीम घेतात. जेव्हा या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्यात आला. तेव्हा असे दिसून आले की, बहुतांश महिला या जोखीम स्वीकारताना त्यातून फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक होईल. याचाच अधिक विचार करतात. त्यामुळे त्या शेवटी जोखीम असलेल्या भानगडीत न पडण्याचा निर्णय घेतात. त्या तुलनेत पुरुष हे जास्तीत जास्त जोखीम घेण्याच्या मनस्थितीमध्ये असतात आणि त्या जोखमीतून त्यांना फायदाच होईल,असा त्यांना विश्वास असतो.
बाथ स्कूल ऑफ मॅनेजमेंट या विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. ख्रिस डॉसन हे स्त्री-पुरुषांमधील भिन्न विचारांवर भाष्य करतात. ते स्पष्ट करतात की, उद्योग असो किंवा उच्च पदावरील नोकरी किंवा शेअर मार्केटमधील ट्रेडिंग असो यामधून पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया या खूपच कमी रिस्क घेताना आपल्याला दिसतात.
जोखीम किंवा होणाऱ्या नुकसानीचा स्त्रिया कसा विचार करतात. याबाबत डॉ. डॉसन यांनी 13,575 जणांच्या सॅम्पलचा अभ्यास करून त्यातून काही निष्कर्ष काढले आहेत. जसे की डॉसन यांनी कुटुंबात येणाऱ्या उत्पन्नाचा कुटुंबातील स्त्री आणि पुरुषांवर कसा परिणाम होतो, हे तपासले. यात असे दिसून आले की, कुटुंबातील उत्पन्नाच्या प्रमाणात कमी-जास्त असा बदल झाला की त्याचा परिणाम स्त्रियांवर अधिक दिसून येतो. स्त्रियांच्या तुलनेत पुरषांना याचा ताण किंवा त्रास कमी होत असल्याचे दिसून आले.
जोखमीबरोबरच पैशांबाबतच्या अपेक्षा हा सुद्धा महत्त्वाचा लिंगभेद डॉ. डॉसन यांनी अभ्यासला आहे. त्यांना यामध्ये असे दिसून आले की, पैशांच्या बाबतीत स्त्रियांच्या तुलनेत पुरुष अधिक आशावादी असल्याचे दिसून येते. हा आशावाद डॉ. डॉसन हे पुरुषाच्या आत्मविश्वासाशी जोडतात. म्हणजेच स्त्री आणि पुरुषांची मानसिकता किंवा विचार करण्याची पद्धत ही कारणीभूत ठरते.