Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ADR Report: आठ राजकीय पक्षांपैकी या पक्षाकडे आहे सर्वाधिक संपत्ती, पाहा कोण आहे टाॅपवर

Money

ADR Report: असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने एक रिपोर्ट जारी केला आहे. त्यानुसार 2021-22 या आर्थिक वर्षात आठ राजकीय पक्षांनी एकूण 8,829.158 कोटी रुपयांपर्यंतची संपत्ती घोषित केली आहे. तर यापैकी सर्वाधिक संपत्ती भारतीय जनता पार्टीच्या नावावर असल्याची माहिती रिपोर्टमधून मिळत आहे.

भारतात एकूण 8 राजकीय पक्ष आहेत. त्यांनी 2021-22 या आर्थिक वर्षात एकूण संपत्ती 8,829.158 कोटी रुपयांपर्यंत वाढली असल्याचे घोषित केले आहे. यापैकी सर्वाधिक मालमत्ता भारतीय जनता पक्षाने (BJP) 2021-22 या आर्थिक वर्षात घोषित केली आहे. ADR च्या रिपोर्टनुसार भाजपाकडे 6,046.81 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसेच, या 8 राजकीय पक्षांची संपत्ती 2020-21 मध्ये 7,297.61 कोटी रुपये एवढीच होती. त्यामुळे एकंदरीत सर्वच पक्षाच्या संपत्तीत वाढ झाली असल्याचे समजते.

भाजपाच्या संपत्तीमध्ये 21.17 टक्क्यांची वाढ

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने जारी केलेल्या रिपोर्टनुसार, भाजपाने 2021-22 या आर्थिक वर्षात 6,046.81 कोटी रुपयांची संपत्ती घोषित केली आहे. तर 2020-21 मध्ये भाजपाने घोषित केलेली संपत्ती एकूण 4,990.19 कोटी रुपये होती. यावरुन भाजपाच्या संपत्तीमध्ये 21.17 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे भाजपाने या 8 राजकीय पक्षात बाजी मारली असून संपत्तीच्या बाबतीत भाजपाच अव्वल आहे.

या पक्षांचा आहे समावेश

या 8 राजकीय पक्षांमध्ये, भाजपा (BJP), इंडियन नॅशनल काॅंग्रेस (INC), राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी (NCP), बहुजन समाज पक्ष (BSP), ऑल इंडिया तृणमूल काॅंग्रेस (AITC), नॅशनल पीपल्स पार्टी (NPP), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPI-M) यांचा समावेश आहे. या सर्वा पक्षांची मिळून 2021-22 या आर्थिक वर्षात एकूण संपत्ती 8,829.158 कोटी असल्याचा रिपोर्ट ADR ने दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपत्तीत कमालीची वाढ

यामध्ये महाराष्ट्रातील शरद पवारांच्या नेतृत्वा खालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपत्तीचाही उल्लेख आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची एकूण संपत्ती 2021-22 मध्ये 74.54 कोटी झाली आहे. ती 2020-21 मध्ये 30.93 कोटी रुपये होती. त्यामुळे पक्षाच्या संपत्तीत एका वर्षात कमालीची वाढ झाली आहे.  तसेच, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संपत्तीत ही किंचीत वाढ पाहायला मिळत आहे. या पक्षाची संपत्ती 2020-21 मध्ये 14.05 कोटी होती ती  2021-22 मध्ये वाढून 15.72 कोटी झाली आहे.

बसपाच्या संपत्तीत झाली घट

एकीकडे काही पक्षामध्ये वाढ पाहायला मिळत असताना, मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाच्या (BSP) वार्षिक संपत्तीत घट झालेली रिपोर्टवरुन दिसून येत आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये पक्षाची संपत्ती 732.79 कोटी रुपयांवरून 5.74 टक्क्यांनी घटून 2021-22 मध्ये एकूण संपत्ती 690.71 कोटी रुपये झाली आहे.

तृणमूल काँग्रेसमध्ये 151.70 टक्क्यांची वाढ

तृणमूल काँग्रेसची (AITC) एकूण संपत्ती आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये फक्त 182.001 कोटी इतकीच होती. मात्र, आता घोषित केलेल्या आकडेवारीनुसार 151.70 टक्क्यांनी वाढून 458.10 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या संपत्तीत भरमसाठ वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. 

काॅंग्रेसमध्येही 16.58 टक्क्यांची वाढ

तसेच काॅंगेस पक्षाच्या संपत्तीत ही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 2020-21 मध्ये काँग्रेसची संपत्ती 691.11 कोटी रुपये होती, जी 2021-22 मध्ये 16.58 टक्क्यांनी वाढून 805.68 कोटी रुपये झाली आहे.  तर CPI-M ची संपत्ती आर्थिक वर्ष 2020-21 मधील 654.79 कोटी रुपयांवरून 2021-22 मध्ये 735.77 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

पक्षांवर पैसे आहेत बाकी

ADR च्या रिपोर्टनुसार, 8 राजकीय पक्षांच्या काही देणी बाकी आहेत. यामध्ये  2020-21 साठी 103.55 कोटींच्या देणी बाकी होत्या. ज्यात कॉंग्रेसवर सर्वाधिक 71.58 कोटी रुपये आणि CPI-M वर 16.109 कोटी रुपये देणे असल्याचे जाहीर केले होते. मात्र, 2021-22 काॅंग्रेसवर  41.95 कोटींचे देणी बाकी आहे.  CPI-M वर 12.21 कोटी देणी बाकी आहे. त्यामुळे दोघांनाही द्याव्या लागणाऱ्या पैशात घट दिसून येत आहे.  ADR नुसार ICAI ने मार्गदर्शक तत्व घालून दिले असूनही राजकीय पक्ष त्या वित्तीय संस्था, बॅंकेची माहिती देत नाहीत, ज्यांच्याकडून त्यांनी लोन घेतले आहे.