गुंतवणूक म्हटले की विचार करुनच करावी लागते. कारण, पैसा गुंतवल्यावर तो मिळण्याची हमी असली तरच गुंतवण्याला फायदा आहे. त्यामुळे अनेक जण सुरक्षित ठिकाणीच गुंतवणुकीला प्राधान्य देतात. त्यामुळेच आम्ही पोस्ट ऑफिस आणि SBI च्या RD व्याजदराची तुलना केली आहे. कारण, दोन्ही सरकारी संस्था असून ग्राहकांच्या मनात घर करून आहेत. आता ते तुम्हाला ठरवायचे आहे की तुमच्यासाठी कोणती RD योग्य आहे.
SBI रिकरिंग डिपॉझिट
SBI मध्ये RD उघडण्यासाठी तुमचे SBI च्या बॅंकेत खाते असणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. तर RD ची मुदत तुम्ही 1 वर्षापासून 10 वर्षांपर्यंत ठेवू शकता. बॅंक सामान्य ग्राहकांसाठी 6.5 टक्के ते 7 टक्क्यांपर्यंतच्या रेंजमध्य व्याजदर देत आहे. तेच ज्येष्ठ नागरिकांसाठी 7 टक्के ते 7.5 टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळत आहेत. हे दर बॅंकेने 15 फेब्रुवारी 2023 पासून लागू केले आहेत.
नवीन व्याजदरानुसार बॅंक 1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी मुदतीसाठी सामान्य नागरिकांना 6.80 टक्के व्याजदर देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.30 टक्के व्याज मिळत आहे. तसेच, 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी मुदतीसाठी सामान्य नागरिकांना बॅंक 7 टक्के तर याच मुदतीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याजदर मिळत आहे. मात्र, 3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी मुदतीसाठी बॅंक सामान्य ग्राहकांना 6.50 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7 टक्के देत आहे. 5 वर्ष आणि 10 वर्षांपर्यतच्या मुदतीसाठी सामान्य नागरिकांना 6.50 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याजदर दिला जात आहे.
Post Office रिकरिंग डिपॉझिट
पोस्ट ऑफिसची RD 5 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीसह येते. कमीतकमी 10 रुपयांपासून तुम्ही पोस्ट ऑफिसच्या RD मध्ये गुंतवणूक करु शकता. तसेच, RD मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त व्याजदर लाभ देत नाही. सध्या नवीन दरानुसार पोस्ट ऑफिस 5-वर्षाच्या RD साठी 6.5 टक्के व्याजदर देत आहे. त्यामुळ तुम्ही जर पोस्टाच्या खात्यात गुंतवणूक करायचा विचार करत असल्यास, तुमच्या बजेटनुसार ठरवू शकता. कारण, किती डिपाॅझिट करायचे याला कोणतीच मर्यादा नाही.
RD वर कर लागतो?
RD वर मिळणाऱ्या व्याजावर TDS लागू आहे. RD व्याजदरावर 10 टक्के TDS लागू असून जर RD वर मिळणारे व्याज 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर TDS कापला जातो.
आता तुम्हाला दोन्हींच्या व्याजदरांविषयी माहिती झाली आहे. त्यामुळे तुमच्या सोयीनुसार गुंतवणूक केल्यास, तुम्हाला सोप जाईल. तसेच, तुम्हाला RD मुळे गुंतवणुकीची सवयही लागू शकते.