पंतप्रधान जनधन योजनेतंर्गत झिरो बँलन्सवर बँक खाते उघडणाऱ्यांना विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एका सुविधेचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो; तो म्हणजे जनधन योजनेतील खातेदारांना देण्यात येणाऱ्या ओव्हरड्रॉफ्टच्या मर्यादेत 10000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही सुविधा अनेक वित्तीय संस्थाकडून पुरविण्यात येते. मात्र, नेमके ओव्हरड्रॉफ्ट म्हणजे काय? याचे फायदे काय आहेत, याबाबतची माहिती जाणून घेऊयात..
ओव्हरड्रॉफ्ट म्हणजे काय?
ओव्हरड्रॉफ्ट सुविधा म्हणजे एक प्रकारे कर्जाचाच प्रकार आहे. ज्यावेळी तुमच्या खात्यात व्यवहार करण्यासाठी पैसे शिल्लक नसतात अशा वेळी बँकेकडून ओव्हरड्राफ्ट सुविधेचा वापर करून तुम्हाला ठराविक रक्कम काढता येते. या रकमेची तुम्हाला ठराविक कालावधीमध्ये परतफेड करावी लागते. यासाठी बँकेकडून ओव्हरड्राफ्ट शुल्कासह व्याजाचीही आकारणी केली जाते. जनधन खात्यातून आता खातेदारांना 10000 रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा देण्यात आली आहे.
व्याजाचा दर किती?
ओव्हरड्राफ्ट सुविधेतून घेतलेल्या रकमेवर संबंधित वित्तीय संस्थेच्या नियमानुसार व्याज आणि ओव्हरड्राफ्ट शुल्काची आकारणी केली जाते. तसेच तुम्ही जेवढेदिवस पैशांचा वापर करणार आहात,तेवढ्यात दिवसांसाठी तुम्हाला व्याज भरावे लागते. बहुतांश वित्तीय संस्थांकडून दिवसानुसार व्याज आकारणी केली जाते.
काय आहेत फायदे?
ओव्हरड्राफ्ट सुविधेमुळे अनेक फायदे मिळतात. एक म्हणजे तुमच्या खात्यात पैसे नसताना तुम्हाला ठराविक रक्कम उपलब्ध होते. काही वित्तीय संस्थाकडून तुमच्या सॅलरी अकाऊंटवर तुम्हाला 3 महिन्यांपर्यंतच्या पगाराची रक्कम ओव्हर ड्राफ्टच्या माध्यमातून दिली जाते. तसेच ओव्हरड्राफ्ट सुविधेचा तुम्हाला तातडीचे कर्ज घेण्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. तसेच ही रक्कम फेडण्यासाठी तुम्हाला प्रीपेमेंट शुल्क आकारले जात नाही. तसेच या सुविधेमुळे आपत्कालीन परिस्थितीत चेक बाऊन्स होण्यापासून तुम्हाला सुरक्षा मिळू शकते.
कोणाला मिळते सुविधा?
बहुतांश बँकाकडून आपल्या खातेदारांना ओव्हरड्राफ्टची सुविधा पुरवली जाते. तर काहीवेळा खातेदारांना बँकेकडून या सुविधेबाबत वित्तीय संस्थेकडे विनंती करावी घ्यावी लागते. ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी अर्ज करून ही सुविधा प्राप्त करता येते. त्यानंतर बँकाकडून तुमच्या बँक खात्यातील व्यवहाराचे तपशील, तुमचे रेकॉर्ड, क्रेडिट स्कोअरवर या आधारवार ओव्हरड्राफ्टची सुविधा पुरवली जाते.