आर्थिक परिघातील विविध घटकांची आर्थिक विषयाशी संबंधित माहिती सर्वांना सहजरीत्या उपलब्ध करून देण्यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) 2021 मध्ये Aggregator फ्रेमवर्क या नावाने डेटा-शेअरिंग प्रणाली सुरू केली. या प्रणालीमुळे आर्थिक क्षेत्रात क्रांती घडून येऊ शकते. तसेच याचा फायदा सर्वसामान्य व्यक्तीपासून व्यावसायिकांपर्यंत सर्वांना होईल, असा सरकारला विश्वास आहे. आज आपण या लेखाद्वारे अकाऊंट अॅग्रीगेटर फ्रेमवर्क (Account Aggregator Framework) काय आहे? ते कसे काम करते आणि त्याचा फायदा काय आहे? याबाबत जाणून घेणार आहोत.
अकाऊंट अॅग्रीगेटर फ्रेमवर्क म्हणजे काय? What is Account Aggregator Framework?
अकाऊंट अॅग्रीगेटर फ्रेमवर्क याला मराठीत डेटा (माहिती) सामायिकीकरण यंत्रणा म्हणतात. अकाऊंट अॅग्रीगेटर (Account Aggregator) ही रिझर्व्ह बॅंकेने आर्थिक देवाण-घेवाणीची माहिती सामायिक करण्यासाठी तयार केलेली यंत्रणा आहे; तसेच या यंत्रणेला नॉन-बॅंकिंग वित्तीय कंपनी (Non-Banking Finance Company)चा परवाना देण्यात आला. या यंत्रणेमुळे एखाद्या व्यक्तीची आर्थिक माहिती म्हणजे त्याचे विविध बॅंकांमध्ये असलेली खाती, त्यावरील नाव, पत्ता अशी माहिती डिजिटल पद्धतीने मिळ शकते. अर्थात संबंधित व्यक्तीच्या परवानगीशिवाय ही माहिती ट्रान्सफर होऊ शकणार नाही.
या यंत्रणेमुळे ग्राहकांना अशी सुविधा देणाऱ्या अनेक अकाऊंट अॅग्रीगेटरमधून स्वत:च्या मर्जीने एकाची निवड करता येते. तसेच ग्राहकांची माहिती वापरासाठी प्रत्येकवेळी परवानगी घेण्याचे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचे हक्क ग्राहकाला आहेत.
अकाउंट अॅग्रीगेटर यंत्रणेचा सर्वसामान्यांचा काय फायदा?
भारतात आर्थिक व्यवहारांबाबत ग्राहकांना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. बँक खाते, व्यवहार नोंदींच्या प्रतीवर सह्या करून त्या स्कॅन करून सामायिक करणे, बॅंकेतील महत्त्वाची कागदपत्रे नोटरी करून घेणं, बॅंक स्टेटमेंट काढण्यासाठी बॅंकेत जावे लागते किंवा संबंधित व्यक्तीला स्वत:च्या खात्याचे युजर नेम व पासवर्ड इतरांना द्यावे लागते. या सर्व अडचणींवर अकाऊंट अॅग्रीगेटरमुळे मात करता येऊ शकते. मोबाईलद्वारे डिजिटल डेटा सहज मिळवून तो इतरांना लगेच आणि सहजरीत्या सामायिक करता येईल. पण यासाठी संबंधित व्यक्तीच्या बँकेला अकाऊंट अॅग्रीगेटर यंत्रणेत सामील व्हावे लागेल.
सध्या भारतातील 8 बँका या यंत्रणेत सामील झाल्या आहेत. अकाऊंट अॅग्रीगेटर यंत्रणेत सहभागी झालेल्या बॅकांमध्ये अॅक्सिस बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी व इंडसइंड बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बॅंक, आयडीएफसी बॅंक आणि फेडरल बॅंक यांचा समावेश आहे. या 8 बॅंकांपैकी अॅक्सिस, आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि इंडसइंड बँकेने ग्राहकांच्या संमतीवर आधारित डेटा सामायिकीकरण सुरु केले.
कोणती माहिती शेअर केली जाऊ शकते?
सध्या, अकाऊंट अॅग्रीगेटर यंत्रणेद्वारे चालू आणि बचत खात्यातील (Current & Saving Account) बॅंकिंग व्यवहाराची माहिती जसे की, निवृत्तीवेतन, म्युच्युअल फंड, ब्रोकरेज, तसेच विविध विमा योजनांची माहिती शेअर करण्यासाठी उपलब्ध आहे. येत्या काही काळात फक्त आर्थिक क्षेत्रातीलच नव्हे तर आरोग्य सेवा, मोबाईल नेटवर्क कंपन्यांशी संबंधित माहिती अकाऊंट अॅग्रीगेटर (AA) मिळवता येणार आहे.
AA यंत्रणेद्वारे होणारे माहितीचे सामायिकीकरण कितपत सुरक्षित आहे?
अकाऊंट अॅग्रीगेटर यंत्रणेला ही माहिती पाहता येऊ शकत नाही. त्यांना ती फक्त संबंधित व्यक्तीच्या निर्देशानुसार किंवा संमतीनुसार दुसरीकडे पाठवता येऊ शकते. त्यामुळे AA यंत्रणेतील घटकांना या माहितीचा वापर करता येऊ शकत नाही. अकाऊंट अॅग्रीगेटर यंत्रणा माहिती पाठवताना ती encrypted करून पाठवते. त्यामुळे ती सुरक्षित मानली जाते.
माहिती सामायिक करण्याचा अधिकार ग्राहकांना!
अकाऊंट अॅग्रीगेटर यंत्रणेसाठी नोंद करायची की नाही, तसेच नोंद केल्यानंतरही कोणती आणि किती माहिती सामायिक करायची याचा अधिकार ग्राहकांना आहे. ग्राहक काही कालावधीसाठी यास संमती देऊन पुन्हा ती रद्द सुद्धा करू शकतात.
अकाऊंट अॅग्रीगेटर नोंदणीसाठी काय प्रक्रिया आहे?
अकाऊंट अॅग्रीगेटरच्या अॅप किंवा सहमती या वेबसाईटवरून नोंदणी करता येते. सध्या ग्राहकांना वापरण्यासाठी FinVu , OneMoney , CAMS , Finserve आणि NADL या 4 संस्थांचे अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यांना अकाऊंट अॅग्रीगेटरचे काम करण्याचे परवाने देण्यात आले आहेत. आरबीआयने आणखी काही संस्थांना परवानगी दिली आहे. त्यांची सेवा ही लवकरच सुरू होईल. ग्राहकांना यापैकी एका संस्थेकडे नोंदणी करायची आहे.
अकाऊंट अॅग्रीगेटरवर नोंदणी करण्यासाठी शुल्क आकारतात का?
शुल्क आकारण्याचा अधिकार अकाऊंट अॅग्रीगेटर आणि संबंधित बॅंका किंवा आर्थिक संस्था यांच्यादरम्यान झालेल्या करारावर अवलंबून आहे. ज्या AA संस्था संबंधित आर्थिक संस्थांकडून शुल्क आकारत असतील, तर त्या ग्राहकांना मोफत सेवा देऊ शकतात. पण याबाबत प्रत्येक AA संस्थेचे नियम वेगवेगळे असू शकतात.