प्रत्येक माणसाचा बँकेशी जवळचा संबंध असतो. आपली मिळकत सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाची पहिली पसंती ही बँकेला असते. सामान्यांच्या आर्थिक अडचणीतही बँकचं कर्ज देऊन मदतीचा हात देते. बँकिंग आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनली आहे. बदलत्या काळानुसार बँक आपल्या खिशात आली आहे. बँकिंग व्यवस्थेचा देशाच्या प्रगतीत मोलाचा वाट आहे. तसेच सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या योजना किंवा मिळणार आर्थिक लाभही बँकेच्या मार्फतच सर्वसामान्यांपर्यंत पोहोचते. प्रत्येक बँक ही त्या देशाचा कणा असते.
बँक म्हणजे काय? What is Bank?
बँक ही एक अधिकृत आणि परवानाधारक वित्तीय संस्था असून, या माध्यमातून आपल्या ठेवी प्राप्त करण्यास, त्या ठेवण्यास, आवश्यकतेनुसार ग्राहकांना पैसे काढण्यास आणि कर्ज घेणे शक्य होते. याव्यतिरिक्त, बँका संपत्ती व्यवस्थापन, लॉकर्स, चलन विनिमय इत्यादीसारख्या वित्तीय सेवा देखील देतात. भारतामध्ये देशातील बँकिंग प्रणाली भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) नियंत्रित केली जाते ,जी भारताची केंद्रीय आणि नियामक संस्था आहे.
बँकांचे प्रकार (Types of Bank)
कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये बँका महत्वपूर्ण भूमिका बजावीत असतात. चलनाचे नियंत्रण हे बँकांच्या माध्यमातून होत असते. लोकांना पैसा पुरविणे, त्यांच्या पैशांचे संरक्षण करणे आणि त्यांना आवश्यकता पडेल तेव्हा ते पैसे त्यांना उपलब्ध करून देणे अशी महत्वपूर्ण कामे बँकांकडून पार पडली जातात. शिवाय अल्प आणि दीर्घकालीन कर्जेही बँकांकडून दिली जातात.पूर्वीच्या वस्तूविनिमय पद्धती ऐवजी पैशांच्या सहाय्याने व्यवहाराला सुरुवात झाली आणि पैशांच्या सुरक्षेसाठी आणि नियंत्रणासाठी बँकेसारख्या व्यवस्थेची गरज भासू लागली. हळू हळू कालानुरूप बँकांच्या स्वरूपात, कार्यशैलीत आणि प्रकारांमध्ये बदल होत गेले. आजघडीला बँकांचे काही प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे.
राष्ट्रीय बँक (National Bank)
कोणत्याही देशाची एक राष्ट्रीय बँक असते. ही बँक थेट सामान्य ग्राहकांशी सबंधित नसते. त्या देशातील इतर बँकांवर देखरेख ठेवण्याचे, त्यांना मार्गदर्शन करण्याचे आणि आर्थिक पाठबळ देण्याचे काम ही बँक करीत असते. त्यामुळे ती बँकांची बँक म्हणूनही ओळखली जाते. थोडक्यात, राष्ट्रीय बँक त्या देशातल्या सरकारची बँक म्हणून काम करते. भारतीय रिझर्व्ह बँक भारताची राष्ट्रीय बँक आहे.
व्यापारी बँक (Merchant Bank)
व्यापारी बँकांचा संबंध थेट ग्राहकांशी म्हणजेच तिच्या खातेधाराकांशी येत असतो. खातेधाराकांच्या ठेवी सुरक्षित ठेवणे, त्यांना हवे तेव्हा त्यांच्या खात्यातील पैसे उपलब्ध करून देणे, कर्जाच्या रकमा देणे अशा प्रकारची कामे व्यापारी बँका आपल्या दैनंदिन व्यवहारात पार पाडीत असतात. सरकारी बँका (स्टेट बँक ऑफ इंडिया), खाजगी बँका(वैश्य बँक) आणि परदेशी बँका(एचडीएफसी बँक) या तीन प्रकारच्या बँकांचा व्यापारी बँकांमध्ये समावेश होतो.
सहकारी बँक (Co-operative Bank
सहकारी बँका या प्रामुख्याने सहकार तत्वावर चालतात. सर्वसाधारणपणे, आपल्या सभासदांना बँकिंगच्या सुविधा पुरविणाऱ्या सहकारी संस्थांना सहकारी बँका म्हणतात. मात्र सहकारी बँकांना रिजर्व्ह बँकेचे नियम पाळणे बंधनकारक असते. या बँकांचे कार्यक्षेत्र त्यांच्या सभासदांपुरतेच आणि मर्यादित स्वरूपाचे असते. यामध्ये प्रामुख्याने स्थानिक सहकारी पतसंस्था, जिल्हा सहकारी पतसंस्था व राज्य सहकारी पतसंस्था यांचा समावेश होतो.
विकासात्मक बँक (Development Bank)
मोठमोठ्या उद्योगांना यंत्रसामग्री, आधुनिक तंत्रज्ञान किंवा व्यवसाय वृद्धीसाठी मोठ्या प्रमाणात पैशांची आवश्यकता असते. यासाठी काही विशिष्ट बँका लघु व दीर्घकालीन कर्जे पुरवतात. त्यांना विकासात्मक बँका म्हणतात. उदा. इंडस्ट्रीयल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन.
विशेष बँक (Special Bank)
याव्यतिरिक्त काही बँका या विशेष क्षेत्रातच सुविधा पुरविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या असतात. त्यामध्ये नाबार्ड, एक्झिम बँक यांचा समावेश होतो.
बँक हा सामान्यांच्या रोजच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. पण बँक म्हणजे काय आणि बँकेचे प्रकार हे अनेकांना माहित नसतात.