स्वत:चे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यामुळे घर घेण्यासाठी अथवा घराचे बांधकाम करण्यासाठी अनेकजण गृहकर्ज काढतात.मात्र, काहीवेळा आर्थिक अडचणींमुळे गृहकर्जाचा हप्ता चुकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला किती दंड आकारला जातो. तसेच किती हप्ते चुकल्यास तुमचे कर्ज थकीत म्हणून घोषित केले जाते. बँकेकडून काय कारवाई केली जाते याबाबतची माहिती आपण जाणून घेऊयात..
गृहकर्जाचा हप्ता चुकल्यास ?
घरासाठी आपण कर्ज काढल्यानंतर त्यासाठी संबंधित बँकेने महिन्याला ठरवून दिलेले हप्ते (EMI) वेळेत भरणा करणे ही आपली जबाबदारी आहे. मात्र, काहीवेळेला दिलेल्या तारखेला कर्जाचा हप्ता भरला जात नाही किंवा एक किंवा दोन महिन्यांसाठी कर्जाचे हफ्ते थकीत होतात. त्यावेळी चुकलेल्या हप्त्यावर बँकेकडून दंड (PENAL INTEREST) आकारला जातो. हा दंडाची रक्कम सर्वसाधारण पणे हप्त्याच्या रकमेवर 1 ते 2 टक्क्यांपर्यंत आकारली जाते. उदाहरणार्थ जर तुमचा महिन्याचा हप्ता हा 50,000 असेल तर तुम्हाला 2% दराने 1,000 रुपये दंड आकारला जातो.
कर्ज थकीत केव्हा होते?
जर तुमच्या आर्थिक समस्यांमुळे एक दोन हप्ते थकले तर तुम्हाला गृहकर्जाच्या हप्ते आणि त्यावरील दंडाची रक्कम भरून तुमचे कर्ज नियमित करता येते. मात्र जर तुमचे सलग तीन EMI चुकले तर बँकेकडून तुमचे कर्ज थकीत म्हणून घोषित करण्यात येते. जर 90 दिवसांपेक्षा जास्त काळ कर्जाचे हप्ते थकीत राहिले तर बँकेकडून तुम्हाला नियमानुसार नोटीस पाठवली जाते. तसेच 180 दिवासापेक्षा जास्त काळ कर्जाचे हप्ते थकीत राहिल्यास बँक कर्ज वसुलीसाठी तुमची मालमत्ता जप्तीची प्रक्रियाही सुरू करू शकते. तसेच कर्जदारावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. तुम्हाला कोर्टाकडून नोटीस प्राप्त होऊ शकते.
बँकेकडे विनंती
अशा प्रकारच्या दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी शक्यतो कर्जाचे हप्ते चुकवू नका. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो. तसेच गृह कर्जाचे हप्ते भरण्यास तुमची आर्थिक समस्या असेल तर तुम्ही कर्जाचे हप्ते काही काळासाठी थांबवण्यासाठी बँकेकडे विनंती करू शकता. काही वेळेस बर्याच बँका 3 ते 6 महिन्यांसाठी EMI थांबवण्याची मुभा देतात. त्यानंतर तुमची आर्थिक परिस्थिती सक्षम झाल्यानंतर पुन्हा तुम्ही या कर्जाची परत फेड करू शकता.