बँक लॉकरचा वापर मौल्यवान वस्तू, दागदागिने तसेच रोख रक्कम ठेवण्यासाठी केला जातो. 18 वर्षांखालील व्यक्ती बँकेत लॉकर घेऊ शकत नाही. लॉकर संयुक्त नावा (Joint Name) नेही सुरू करता येतो. संयुक्त पद्धतीत दोनपैकी एक व्यक्तीही लॉकर उघडू शकते. आतापर्यंत बँकेत खाते असेल तरच खातेधारकाला लॉकरची सुविधा दिली जात होती. पण रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नव्या नियमांनुसार, बँकेत बचत खाते वा मुदत ठेवी नसतील तरीही सदर व्यक्तीला लॉकरची सुविधा देणे बँकांसाठी बंधनकारक असणार आहे.
लॉकर घेण्यासाठी बँकेकडे खातेदाराला अर्ज सादर करावा लागतो. लॉकरच्या सुविधेसाठी बँकांकडून शुल्क आकारणी केली जाते. म्हणजेच आपण बँकेकडून लॉकर भाड्याने घेत असतो. यासाठीचे भाडे बँकेकडून आगाऊच वसूल केले जात असते. सरकारी बँकांकडून यासाठी वर्षाकाठी साधारणतः 1 ते 10 हजार रुपयांपर्यंत भाडे आकारले जाते. खासगी बँकांमध्ये यासाठी 20 हजार रुपयांपर्यंत रक्कम आकारली जाते. लहान, मध्यम आणि मोठे असे लॉकरचे तीन प्रकार असतात. भाड्याची रक्कम लॉकरच्या प्रकारानुसार ठरते.
समजा बँक खातेधारकाने आपल्या बँकेतील लाँकरचे भाडे तीन वर्षाच्या कालावधीत वेळेवर जमा केले नाही तर बँक अशा खातेधारकाच्या विरुद्ध कारवाई करू शकते. अशा परिस्थितीत त्याचे बँक लाँकर देखील उघडण्याचा हक्क RBIच्या नव्या नियमांनुसार बँकेला असणार आहे. बँक लॉकरच्या दोन चाव्या असतात. यातील एक ग्राहकाकडे, तर दुसरी बँकेकडे असते. दोन्ही किल्ल्या लावल्याखेरीज लॉकर उघडत नाही.
लॉकरची चावी अत्यंत काळजीपूर्वक ठेवणे फार महत्त्वाचे आहे. चावी हरवल्यास बँकेला पुन्हा सर्व कागदपत्रे द्यावी लागतात. किल्ली हरवल्यावर लॉकर तोडायची वेळ आली तर त्यासाठी बँका आपल्याकडून शुल्क आकारतात. लॉकर फोडताना ग्राहक स्वतः उपस्थित राहिला नाही तर त्याच्या लॉकरमधील सामान सीलबंद डब्यात ठेवले जाते आणि नंतर ते ग्राहकाच्या स्वाधीन केले जाते. बँकेतील लॉकर दररोज पाहता येत नाही. यासाठी वर्षातून 6 वेळा, 12 वेळा, 20 वेळा असे बंधन घालण्यात आले आहे.