पायाभूत सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या विष्णु प्रकाश आर पुंगलिया या कंपनीने आज मंगळवारी 5 सप्टेंबर 2023 रोजी शेअर मार्केटमध्ये जोरदार एंट्री घेतली. आयपीओमध्ये शेअर प्राप्त झालेल्या भाग्यवान गुंतवणूकदारांना आज पहिल्याच दिवशी सरासरी 60% फायदा झाला.
विष्णु प्रकाश आर पुंगलियाचा शेअर 66.67% प्रीमियमसह एनएसईवर 165 रुपयांना लिस्ट झाला. कंपनीने आयपीओसाठी प्रती शेअर 99 रुपये दर निश्चित केला होता. मुंबई शेअर बाजारात विष्णु प्रकाश आर पुंगलियाचा शेअर 163.3 रुपयांवर लिस्ट झाला.
लिस्टींगपूर्वी ग्रे मार्केटमध्ये विष्णु प्रकाश आर पुंगलियाचा शेअर तेजीत होता. ग्रे मार्केटमध्ये विष्णु प्रकाश आर पुंगलियाचा शेअर 54 रुपये प्रिमीयमसह ट्रेड करत होता. त्यामुळे लिस्टींग गेन होणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
विष्णु प्रकाश आर पुंगलिया कंपनीने 3 कोटी 12 शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी यामध्ये 35%, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIB) 50% आणि हाय नेटवर्थ गुंतवणूकदारांसाठी (HNI) 15% आरक्षण ठेवण्यात आले होते.
आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीला 90.6 कोटींचा नफा झाला. कंपनीला 1168 कोटींचा महसूल मिळाला आहे. आर्थिक वर्ष 2021 ते 2023 या काळात कंपनीची वार्षिक 55.1% दराने वृद्धी झाली. 15 जुलै 2023 अखेर कंपनीकडे 3799 कोटींची कंत्राटे आहेत.
पायाभूत सेवा क्षेत्रातील आघाडीची कंपनी
विष्णू प्रकाश आर पुंगलिया कंपनीचे मुख्यालय राजस्थानमध्ये असून ही कंपनी इंजिनिअरिंग, प्रोक्युरमेंट आणि कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये कार्यरत आहे. कंपनीने केंद्र सरकारसह आणि विविध 9 राज्य सरकारबरोबर, स्थानिक पातळीवरील कंपन्यांसाठीही काम केले आहे. कंपनीकडे 499 यंत्रसामुग्री आहे. कंपनीकडील स्थावर मालमत्तेचे मूल्य 136 कोटी इतके आहे.कंपनी 4 वेगवेगळ्या प्रकारच्या सेक्टरमध्ये प्रामुख्याने कार्यरत आहे. यामध्ये वॉटर सप्लाय प्रोजेक्ट, रेल्वे प्रोजेक्ट, रोड प्रोजेक्ट आणि इरिगेशन नेटवर्क प्रोजेक्टचा समावेश आहे.
कर्मचाऱ्यांना झाला बंपर फायदा
कंपनीने आयपीओसाठी प्रति शेअर्सची किंमत 94-99 रुपये अशी निश्चित केली होती. याच्या एका लॉटमध्ये 150 शेअर्सचे वाटप करण्यात आले. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सुमारे 3 लाख शेअर राखीव ठेवले होते.कर्मचाऱ्यांसाठी राखीव कोट्यामध्ये प्रती शेअर 9 रुपयांचा डिस्काउंट देण्यात आला होता. आजच्या दमदार लिस्टींगने विष्णु प्रकाश आर पुंगलियामधील कर्मचाऱ्यांसाठी बंपर फायदा झाला.