उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा 500 कोटींचा आयपीओ येत्या 12 जुलै 2023 पासून खुला होणार आहे. या आयपीओमध्ये बँकेने प्रती शेअर 23 ते 25 रुपये असा किंमतपट्टा निश्चित केला आहे.
बँकेने शेअर बाजारातून भांडवल उभारणीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार समभाग विक्री योजना 12 जुलै 2023 रोजी खुली होईल.गुंतवणूकदारांना 14 जुलैपर्यंत आयपीओसाठी अर्ज करता येईल.
या योजनेत शेअर्सची किंमत पाहता किमान 600 शेअर्ससाठी अर्ज करता येणार आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 15000 रुपयांची गुंतवणूक करता येईल. यात एक गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉट्स अर्थात 1.95 लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल.
आयपीओमध्ये 1% शेअर्स कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. किमान 20 लाख शेअर्स कर्मचाऱ्यांना इश्यू केले जाणार आहेत. त्याशिवाय 75% शेअर्स क्वालिफाईड बायर्स, 15% हाय नेटवर्थ आणि 10% किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव हिस्सा ठेवण्यात आला आहे.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक ही उत्तर भारतातील वेगाने वाढणारी बँक आहे. रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर 2015 मध्ये उत्कर्ष कोअरइन्व्हेस्ट या कंपनीला स्मॉल फायनान्स बँकेचा परवाना दिला होता. जानेवारी 2017 पासून बँकेने प्रत्यक्ष बँकिंग सेवेला सुरुवात केली होती.
बँकेचे वाराणसीमध्ये मुख्यालय असून बँकेने आर्थिक वर्ष 2019 ते 2023 या वर्षाच 6000 कोटींचे कर्ज वाटप केले आहे.
सध्या 26 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा विस्तार आहे. बँकेचे 830 आउटलेट्स असून 15424 कर्मचाऱ्यांचा ताफा आहे. मार्च 2023 अखेर 35 लाख 90 हजार ग्राहक आहेत.
पाचवी स्मॉल फायनान्स बँक शेअर मार्केटमध्ये प्रवेश करणार
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक ही शेअर मार्केटमध्ये प्रवेश करणारी पाचवी स्मॉल फायनान्स बँक ठरणार आहे. यापूर्वी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक आणि सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक या पाच स्मॉल फायनान्स बँकांचे शेअर लिस्ट झाले आहेत.