• 27 Mar, 2023 06:20

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Upcoming IPO in March 2023: दोन कंपन्यांची माघार तरिही 9 कंपन्यांचे IPO बाजारात धडकणार, जाणून घ्या सविस्तर

IPO

Upcoming IPO in March 2023: शेअर मार्केटमधील 'आयपीओ'चा दुष्काळ लवकरच संपणार आहे. बाजारात सध्या सुरु असलेली घसरण आणि अनिश्चितता असल्याने दोन कंपन्यांनी माघार घेतली आहे. मात्र 9 कंपन्यांचे आयपीओ मार्च महिन्यात बाजारात धडकणार आहेत. प्राथमिक बाजारात 9 कंपन्या प्रारंभिक समभाग विक्री करणार असून त्यातून 17000 कोटींचा निधी उभारणार आहेत.

शेअर मार्केटमधील 'आयपीओ'चा दुष्काळ लवकरच संपणार आहे. बाजारात सध्या सुरु असलेली  घसरण आणि अनिश्चितता असल्याने दोन कंपन्यांनी माघार घेतली आहे. मात्र 9 कंपन्यांचे आयपीओ मार्च महिन्यात बाजारात धडकणार आहेत. प्राथमिक बाजारात 9 कंपन्या प्रारंभिक समभाग विक्री करणार असून त्यातून 17000 कोटींचा निधी उभारणार आहेत.

मागील दोन महिने आयपीओ मार्केटमध्ये शुकशुकाट होता. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात एकही आयपीओ दाखल झाला नाही. आता आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असून जवळपास 9 कंपन्या भांडवल उभारणीसाठी सज्ज झाल्या आहेत. येत्या चार ते सहा आठवड्यांत बाजारात 9 आयपीओ दाखल होतील, असे सूत्रांनी म्हटले आहे. अॅव्हलॉन टेक्नॉलॉजीस, कॅपिलरी टेक्नॉलॉजीस, कोजेंट सिस्टम्स, दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टम, मॅनकाइंड फार्मा, नेक्सस मॉल्स रिट, टीव्हीएस लॉजेस्टीक, सिग्नेचर ग्लोबल आणि  उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अशा 9 कंपन्या आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. या 9 कंपन्या एकूण 17000 कोटींची भांडवल उभारणार आहेत.

आर्थिक वर्ष 2022 मध्ये 40 कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून 59302 कोटींचा निधी उभारला आहे. वर्ष 2021मध्ये 60 कंपन्यांनी शेअर बाजारात आयपीओ आणले होते. त्यातून 1.19 लाख कोटींचे भांडवल उभारले होते.

ipos-to-enter-the-stock-market-in-the-next-month.jpg

प्राथमिक बाजारात 2023 मधील पहिला IPO दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टम कंपनीचा आहे. कंपनी समभाग विक्रीतून 500 कोटींचे भांडवल उभारणार आहे. 1 मार्च 2023 पासून शेअर्स विक्रीसाठी खुले होणार असून 3 मार्च 2023 पर्यंत यात अर्ज करता येईल. प्रती शेअर 560 ते 590 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना किमान 25 शेअर्ससाठी अर्ज करता येईल. इन्फोसिसचे संस्थापक नंदन निलेकणी यांची दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टम कंपनीमध्ये गुंतवणूक आहे. आयपीओच्या माध्यमातून नंदन निलेकणी आणि कुटुंबीय 14.40 लाख शेअर्सची विक्री करणार आहेत. निलेकणी यांनी 125.28 रुपये प्रती शेअरने या कंपनीत गुंतवणूक केली होती. आयपीओमुळे निलेकणी कुटुंबीयांना जबरदस्त फायदा होणार आहे.

दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टम कंपनीच्या आयपीओला ग्रे मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ग्रे मार्केटमध्ये दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टमचा शेअर 60 रुपये प्रिमीयमवर ट्रेड करत आहे. सध्या या शेअरचा भाव 650 रुपये इतका आहे. 14 मार्च 2023 रोजी कंपनी शेअर मार्केटमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

दोन SME IPO याच आठवड्यात बाजारात धडकणार

दोन कंपन्यांचे आयपीओ हे बीएसई एसएमई मंचावर लिस्ट होणार आहेत. बीएसई एसएमई हा छोट्या कंपन्यांसाठी भांडवल उभारणीचा मंच आहे. यातील पहिला आयपीओ रेसजेन कंपनीचा 28 कोटी रुपयांचा आयपीओ 28 फेब्रुवारी 2023 रोजी खुला होणार आहे. 2 मार्च 2023 पर्यंत या आयपीओसाठी गुंतवणूकदारांना अर्ज करता येईल. यासाठी प्रती शेअर 45 ते 47 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. दुसरा एसएमई आयपीओ हा सिस्टॅंगो टेक कंपनीचा आहे. हा आयपीओ 2 मार्चपासून खुला होणार आहे. या आयपीओत प्रती शेअर 85 ते 90 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. कंपनी 3868800 शेअर्स इश्यू केले जातील. 15 मार्च 2023 रोजी बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर हा शेअर लिस्ट होणार आहे.

दोन कंपन्यांनी घेतली माघार 

सेबीने भांडवल उभारणीसाठी आयपीओ आणण्याची परवानगी देऊन सुद्धा दोन कंपन्यांनी आयपीओतून माघार घेतली आहे. दक्षिण भारतातील जॉयलुक्कास ज्वेलर्स या कंपनीने 2300 कोटींचा आयपीओ प्लॅन गुंडाळला आहे. फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी जॉयलुक्कास ज्वेलर्सवर सक्तवसुली संचनालयाने (ईडी) कारवाई केली होती. ईडीने जॉयलुक्कास ज्वेलर्सची 305 कोटींची संपत्ती जप्त केली होती. त्यानंतर जॉयलुक्कास ज्वेलर्सने 2300 कोटींचा आयपीओ रद्द केला होता.

फॅशन व्यवसायातील फॅब इंडिया या कंपनीने 4000 कोटींचा आयपीओ गुंडाळला आहे. शेअर मार्केटमधील मंदी आणि अनिश्चिततेमुळे आयपीओ रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे फॅब इंडियाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. सध्याच्या परिस्थितीत कंपनीचा आयपीओ आणि त्याचे आकारमान पाहता योजना पुढे नेणे जोखमीचे ठरेल. त्यामुळे कंपनीने तूर्त ही योजना रद्द केली आहे. फॅब इंडियाला ऑफर फॉर सेलसाठी एप्रिल 2023 पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. 

सेबीची परवानगी असूनही 33 कंपन्यांनी IPO गुंडाळाले होते

विशेष म्हणजे मागील महिनाभरात शेअर मार्केटमध्ये प्रचंड घसरण झाली आहे. हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहातील शेअर्सची प्रचंड घसरण झाली. याची झळ सेन्सेक्स आणि निफ्टीला बसली. निफ्टी 3.5% ने कोसळला. बाजारातील नकारात्मक वातावरण पाहून नुकताच दोन कंपन्यांनी आयपीओ रद्द केले. मागील आठ महिन्यात 33 कंपन्यांना आयपीओतून माघार घ्यावी लागली होती. सेबीने परवानगी देऊन सुद्धा या कंपन्यांना वेळेत आयपीओ दाखल करता आला नाही. 33 कंपन्यांकडून 49300 कोटींचे भांडवल उभारण्याची योजना होती.