वाहन उद्योगातील आघाडीच्या टीव्हीएस ग्रुपची उपकंपनी टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स लिमिटेडने आज बुधवारी 23 ऑगस्ट 2023 रोजी बीएसई आणि एनएसई या दोन्ही शेअर मार्केटमध्ये प्रवेश केला. टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्सचा शेअर आयपीओ प्राईसच्या तुलनेत अवघ्या 5% तेजीसह 206.30 रुपयांवर सूचिबद्ध झाला. आयपीओला मिळालेला थंड प्रतिसाद आणि सुमार लिस्टिंगमुळे गुंतवणूकदारांची निराशा झाली.
टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्सचा आयपीओ 2.85 पटीने सबस्क्राईब झाला होता. अलिकडे प्राथमिक बाजारात धडकलेल्या आयपीओंमध्ये तुलनेने कमी प्रतिसाद टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्सला मिळाला होता. मात्र किरकोळ गुंतवणूकादारांसाठीचा राखीव हिस्सा 7.61 पटीने सबस्क्राईब झाला होता.
आज कंपनीने आयपीओतून 880 कोटींचे भांडवल उभारले. टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स लिमिटेडचा शेअरचे कंपनीच्या संचलकांच्या उपस्थितीत आज राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) लिस्टिंग करण्यात आले.
'एनएसई'वर तो 207.05 रुपयांवर लिस्ट झाला. मुंबई शेअर बाजारात तो 206.30 रुपयांवर सूचिबद्ध झाला. आयपीओसाठी कंपनीने 197 रुपयांचा दर निश्चित केला होता. लिस्टींगचा अपेक्षित फायदा न झाल्याने गुंतवणूकदारांची सपशेल निराशा झाली.
टीव्हीएस ग्रुपने प्रमोट केलेल्या टीव्हीएस मोबिलिटी ग्रुपची ही एक कंपनी आहे. टीव्हीएस मोबिलिटीमध्ये एकूण चार विभाग आहेत. त्यात सप्लाय चेन सोल्युशन, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटो डिलरशीप आणि सेल्स अॅंड सर्व्हिस अशा चा विभागात काम करते. टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स लिमिटेड 25 हून अधिक देशांत व्यवसाय करत आहे.
आर्थिक वर्ष 2023 मध्ये 41.8 कोटींचा फायदा
टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स ही 2004 पासून टीव्हीएस ग्रुपमधून विभक्त झाली आहे. कंपनीला आर्थिक वर्ष 2023 मध्ये 41.8 कोटींचा फायदा झाला. त्याआधीच्या वर्षात आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीला 45.8 कोटींचे नुकसान झाले होते. आर्थिक वर्ष 2023 अखेर कंपनीचा महसूल 10 हजार 235 कोटींपर्यंत पोहोचला आहे.
(डिसक्लेमर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्सच्या खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)