रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील 50 बड्या कर्ज बुडव्यांनी बँकांचे 92570 कोटी थकवल्याची माहिती समोर आली आहे.यात फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याची गितांजली जेम्स ही मोठी कर्ज थकबाकीदार कंपनी ठरली आहे. मेहुल चोक्सी 2018 पासून पीएनबी बँक कर्ज घोटाळा प्रकरणी फरार आहे.
अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांनी लोकसभेत सोमवारी बड्या कर्ज थकबाकीदारांची माहिती सादर केली. त्यानुसार गितांजली जेम्स या कंपनीने सर्वाधिक 7848 कोटींची थकबाकी ठेवली आहे. त्या खालोखाल इरा इन्फ्रा इंजिनिअरिंग या कंपनीची 5879 कोटींची थकबाकी आहे. रेइ अॅग्रो कंपनीची 4803 कोटींची थकबाकी असून कॉनकास्ट स्टील अॅंड पॉवर या कंपनीने 4596 कोटींचे कर्ज थकवले आहे.
एबीजी शिपयार्ड या कंपनीने बँकांचे 3708 कोटींचे कर्ज थकवले आहे. फ्रोस्ट इंटरनॅशनलने 3311 कोटी, विनसम डायमंड्सचे 2931 कोटी आणि रोटोमॅक ग्लोबलने 2893 कोटींचे कर्ज थकवले आहे. कोस्टल प्रोजेक्ट्स 2311कोटी आणि झूम डेव्हलपर्सने 2147 कोटींचे कर्ज थकवले आहे.
कर्जबुडवे अर्थात कर्ज फेड करण्याची क्षमता असून देखील हे कर्जदार कर्ज फेड करत नाही. अशा कर्जबुडव्यांविरोधात सरकारने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतल्याचे अर्थ राज्यमंत्री कराड यांनी सांगितले. कर्जवसुलीसाठी बँकांकडून विशेष मोहीम राबवली जाणार आहे. त्याचबरोबर या कर्ज बुडव्यांना नव्याने कर्ज दिली जाणार नाहीत. तसेच पुढील पाच वर्ष नवीन प्रकल्प सुरु करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
यापूर्वीच कर्ज बुडवून भारतातून पळून गेलेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती.याच सभागृहात एका स्वतंत्र उत्तरात अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी उद्योजकांना माफ केलेल्या कर्जाची माहिती सादर केली. मागील पाच वर्षांत बँकांनी 10 लाख कोटींची कर्जे निर्लेखित केल्याचे सीतारामन यांनी म्हटले होते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी 4.8 लाख कोटींची कर्ज वसुली केली तर 1.03 लाख कोटी माफ केल्याचे सितारामन यांनी सांगितले.