रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी (दि. 19 मे ) चलनातून 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याची घोषणा करत त्या 23 मे पासून बदलून घेण्याबाबत सर्वसामान्यांना आवाहन केले होते. त्यानुसार आजपासून (दि. 23 मे) बँकेतून बदलून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. पण नोटा बंद घेताना किंवा बँकेत भरताना नक्कीच काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
Table of contents [Show]
नोटा बदलून घेण्याची प्रक्रिया आजपासून सुरू
तुमच्याकडे असलेली 2000 रुपयांची नोट तुम्ही बँकेत गेला आणि बदलून घेतली इतकी ही सोपी प्रक्रिया नाही. बँकेतून 2000 रुपयांची नोट बदलून घेताना संबंधित व्यक्तीच्या बँक खात्याचे केवायसी असणे आवश्यक आहे. तसेच आरबीआयने घोषित केल्याप्रमाणे एकावेळी एक व्यक्ती फक्त 10 नोटा म्हणजे फक्त 20 हजार रुपये बदलून घेऊ शकतो. नोटा बदलून घेण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे.
2000 रुपयांच्या नोटा बदलण्याचे ठिकाण
प्रत्येक व्यक्ती एका दिवसात कोणत्याही बँकेतून 2 हजार रुपयांच्या किमान 10 बदलून घेऊ शकतो. तसेच आरबीआयच्या 16 रिजनल ब्रान्चमधूनही नोटा बदलून घेता येतील. याचबरोबर ज्यांना बँकेत जाणे शक्य नाही. ते ग्राहक बँक मित्राला घरी बोलावून नोटा बदलून घेऊ शकतात. पण बँक मित्रच्या माध्यमातून एक व्यक्ती एका दिवशी 2 हजार रुपयांच्या दोनच नोटा म्हणजे 4 हजार रुपये बदलून घेऊ शकते.
कॅश जमा करताना सीटीआरचे नियम लागू - सीए संतोष कदम
बँकेत किंवा खात्यात पैसे भरताना तुमचे केवायसी असणे गरजेचे आहे. तसेच खात्यात पैसे भरताना इन्कम टॅक्सशी संबंधित नियम आपोआप लागू होतात. जसे की, तुम्ही खात्यात 50 हजारापेक्षा जास्त रक्कम भरत असाल तर तुम्हाला बँकेकडे पॅनकार्ड सादर करावे लागते. तसेच बँकेच्या प्रत्येक शाखेला कॅश ट्रान्सॅक्शन रिपोर्ट (Cash Transaction Report-CTR) सादर करावा लागतो. या रिपोर्टमधून कोणी किती रक्कम भरली आहे, याची माहिती आरबीआय आणि इन्कम टॅक्स विभागाला कळते.
सीटीआर म्हणजे काय?
Cash Transaction Report (CTR) म्हणजे प्रत्येक बॅंकेच्या शाखेमधून आरबीआय सीटीआर रिपोर्ट मागवून घेते आणि प्रत्येक बँकेला तो तयार करणे बंधनकारक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, बँकेत 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरायची असेल तर पॅनकार्ड द्यावे लागते. अशाप्रकारे बँकेत येणाऱ्या कॅशचा रिपोर्ट सीटीआरमधून दिला जातो.
10 लाखांवरील खात्याचा सीटीआर काढला जातो
तसेच ज्या बचत खात्यात 10 लाखाच्यावर कॅश जमा होत असेल तर बँकेकडून त्या खात्याचा सीटीआर रिपोर्ट तयार केला जातो. प्रत्येक वैयक्तिक खातेदाराला 10 लाखापर्यंत कॅश जमा करता येते. हेच लिमिट करंट खात्यासाठी (Current Account) 50 लाखापर्यंतचे लिमिट दिले आहे. या लिमिटच्यावर खात्यात पैसे जमा झाले तर बँकेकडून सीटीआर रिपोर्ट तयार करून तो आरबीआयकडे पाठवला जातो. याची एक प्रत इन्कम टॅक्स विभागाकडे सुद्धा जाते. हा नियम आताही सर्वांसाठी लागू आहे. तो नकळत 2000 रुपयांची नोट एक्सचेंज करून घेतानाही लागू होऊ शकतो.
सीटीआर रिपोर्टमधून बँकेत कोणी आणि किती पैसे भरले याची माहिती आरबीआय आणि इन्कम टॅक्स विभागाकडे आपोआप जमा होते. त्यामुळे खात्यात रक्कम भरताना या गोष्टींचे भान असणे आवश्यक आहे. कारण 2016 च्या नोटाबंदीवेळी अनेकांनी मोठ्या प्रमाणात कॅश सेव्हिंग अकाउंटमध्ये भरली होती. कालांतराने संबंधित खातेधारकांना इन्कम टॅक्स विभागाच्या नोटीसा आल्या होत्या. काहींना रितसर इन्कम टॅक्स भरावा लागला काहींना जमा केलेल्या रकमेचे स्पष्टीकरण द्यावे लागले होते.