सध्या डिजिटल व्यवहाराचा बोलबाला आहे. बँकेत जावून पैसे भरण्याचे किंवा काढण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत. ऑटो-पे या सुविधेमुळे तर ग्राहकांची मोठी सोय झाली आहे. कारण यामुळे बिल भरणा करायची तारीख लक्षात न राहण्याचा प्रश्नच निकाली निघाला आहे.
दर महिन्याला आपण वीज बिल, विम्याचा हप्ता, क्रेडिट कार्ड बिल, पाणी बिल आदी बिलांचा भरणा करत असतो. यासाठी विशिष्ट तारखेची डेडलाईन पाळणे गरजेचे असते. वेळेवर बिल भरले नाही तर अकारण अधिक व्याज किंवा दंड भरावा लागतो. अशा स्थितीत ऑटोमेटिक बिल पेमेंट हा एक चांगला पर्याय मानला जातो.
बहुतांश बँकाकडून अशा प्रकारची सुविधा दिली जाते. या सुविधेमुळे दर महिन्याला बिलांवर नमूद केलेल्या अंतिम तारखेपूर्वी तुमच्या खात्यातून रक्कम ऑटो डेबिट (Auto Debit) होऊन सदर संस्था-कंपनी-व्यक्तीच्या खात्यात वर्ग केली जाते. यासाठी बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून ऑटो डेबिटची सुविधा सुरू करू शकता किंवा नेट बँकिंग (Net Banking) च्या माध्यमातूनही ऑटो बिलाची सुविधा सुरू करू शकता. अलीकडील काळात काही बँका ऑटो डेबिटची सुविधा वापरणार्या ग्राहकांना 0.5 ते 10 टक्क्यांपर्यंत कॅशबॅकचा लाभही देत आहेत.
लक्षात ठेवा
- ऑटो पे बिलासाठी खात्यात पुरेशी रक्कम असणे गरजेची आहे.
- ऑटो पेच्या तारखेअगोदर बिलाची तपासणी करावी.
- बिलातील देयकापेक्षा अधिक रक्कम वर्ग केली जात असेल तर वेळीच बँकेला कळवा.
- ऑटो-पेचा पर्याय निवडल्यानंतर आपण व्यवहाराबात गाफील राहणे नुकसानकारक ठरू शकते.
- अनेक बँका शाळेची फीदेखील या सुविधेच्या माध्यमातून जमा करण्यास परवानगी देतात.
- म्युच्युअल फंड, पीपीएफ, एनपीएस आणि अन्य योजनांचे हप्ते देखील ऑटो पेमेंटने करता येतात.