यंदा ऊस लागवड क्षेत्र कमी झाल्याने साखर उत्पादनात घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात साखरचे भाव वाढत आहेत. याचे पडसाद आज बुधवारी 6 सप्टेंबर 2023 रोजी शेअर बाजारात उमटले. साखर उत्पादक कंपन्यांचे शेअर 8% वाढ झाली.
आजच्या सत्रात राणा शुगर्सचा शेअर 5% ने वाढला. त्याचबरोबर श्री रेणुका शुगर्स, दि उगर शुगर्स, द्वारिकेश इंजिनिअरिंग, बलरामपूर चिनी, बजाज हिंदुस्थान शुगर्स या शेअरमध्ये वाढ झाली.
खुल्या बाजारात साखरेची किंमत सहा वर्षाच्या उच्चांकावर गेल्या आहेत. मंगळवारी साखरच्या भावात 3% वाढ झाली. साखरेचा भाव 37 हजार 760 रुपये मेट्रीक टन इतका झाला. ऑक्टोबर 2017 नंतर पहिल्यांदाच साखरेला मिळालेला उच्चांकी दर आहे. मात्र जागतिक बाजारातील साखरेच्या किंमतीच्या तुलनेत भारतीय बाजारातील साखरेचा दर 38% कमी आहे.
यंदा मॉन्सूनने ओढ दिली आहे. जून आणि जुलैमध्ये पावसाने सरासरी गाठली नव्हती. ऑगस्ट कोरडाठाक गेल्याने महाराष्ट्रासह कर्नाटक, उत्तर प्रदेशसारख्या ऊस उत्पादक राज्यांसाठी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. परिणामी साखरेचे उत्पादन 50% ने कमी होण्याची शक्यता आहे.
एका अभ्यासानुसार ऑक्टोबर 2023 पासून सुरु होणाऱ्या साखरेच्या नव्या हंगामात साखरेचे उत्पादन 3.3% ने कमी होण्याची शक्यता आहे. हंगामात साखरेचे उत्पादन 31.7 मिलियन टन इतके राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा साखरेसाठी ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागतील.
आज दालमियाचा शेअर 6.5% ने वाढला. दालमिया शुगरचा शेअर 431.17 रुपयांवर गेला होता. ईआयडी पॅरी कंपनीचा शेअर 5.94% तेजीसह 512.25 रुपयांवर गेला होता. उत्तम शुगर मिल्सचा शेअर 9.32% ने वाढला. बलरामपूर चिनीचा भाव 2.23% ने वाढला. आजच्या सत्रात बजाज हिंदुस्थान शुगरचा भाव 3% वाढला.
(डिसक्लेमर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्सच्या खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)