केंद्रातील शिक्षण मंत्रालयाच्यावतीने गुरूवारी (दि. 3 ऑगस्ट) स्टडी इन इंडिया (Study in India-SII) या पोर्टलची सुरुवात करण्यात आली. या पोर्टलच्या माध्यमातून भारतातील उच्च शिक्षणाविषयीची इत्यंभूत माहिती देण्यात आली आहे.
केंद्रीय शिक्षण तसेच कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी स्टडी इन इंडिया (Study in India) या पोर्टलचे उद्धाटन केले. या पोर्टलच्या माध्यमातून भारत हे एक दर्जेदार शिक्षणाचे केंद्र आहे, ही भारताची ओळख पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कार्यक्रमाला विविध विभागांचे मंत्री, विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि विविध देशातील राजदूत उपस्थित होते.
भारतातील विविध अभ्यासक्रम एकाच पोर्टलवर
स्टडी इन इंडिया हे पोर्टल भारतातील उच्च शिक्षणविषयीची संपूर्ण माहिती देणारे परिपूर्ण असे पोर्टल आहे. या पोर्टलमध्ये पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमापासून, पीएचडी, तसेच योग, आयुर्वेद, शास्त्रीय कला अशा भारताचे वैशिष्ट्य असलेल्या शाखांच्या अभ्यासक्रमांची माहिती दिली जाणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे अभ्यासक्रम पाहता येणार आहेत. तसेच त्यासाठी लागणारी पात्रता, शैक्षणिक कागदपत्रे, शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे सहाय्य मिळू शकते, अशी संपूर्ण माहिती इथे उपलब्ध करून दिली जाणार आहे.
'व्हिसा'सह ऑफर लेटरसुद्धा मिळणार
परदेशातून भारतात शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही हे पोर्टल खूप मदतीचे ठरणार आहे. याच पोर्टलवरून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या संस्थांची आणि अभ्यासक्रमांची माहिती त्यांना मिळणार असून, त्यांना आवडीच्या अभ्यासक्रमासाठी इथेच नोंदणी करता येणार आहे. त्याचबरोबर शैक्षणिक काळातील व्हिसा, विद्यापीठाकडून मिळणारी मान्यता आणि इथल्या संस्थांकडून दिले जाणारे ऑफर लेटरसुद्धा या पोर्टलवरून मिळण्याची सुविधा करण्यात आली आहे.
स्टडी इन इंडिया भारतासाठी उपयुक्त
स्टडी इन इंडिया पोर्टलमुळे भारतात शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या परदेशातील विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. हे पोर्टल सर्वांसाठी महत्त्वाचा स्त्रोत ठरणार आहे. शिक्षणापासून नोकरीच्या ऑफर लेटरपर्यंतची सोय यामध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या पोर्टलच्या उद्घाटनावेळी दहापेक्षा जास्त देशांचे राजदूत उपस्थित होते. तसेच यावेळी रशिया, थायलंड, जपान, इथिओपिया, कझाकिस्तान, कोरिया रिपब्लिक आणि इक्वेडोअर या देशातील विद्यार्थी जे सध्या भारतात राहून शिक्षण घेत आहेत; ते उपस्थित होते.