सिमेंट उद्यागोतील आघाडीची कंपनी श्री सिमेंटवर कर चोरीचा ठपका ठेवण्यात आला आहे. श्री सिमेंटने 23000 कोटींची करचोरी केल्याने कॉर्पोरेट क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या वृत्ताचे पडसाद आज श्री सिमेंटच्या शेअरवर उमटले. आज सोमवारी 26 जून रोजी श्री सिमेंटचा शेअर 10% कोसळला होता.
श्री सिमेंटचा शेअर हा मार्केटमध्ये महागड्या शेअर्सपैकी एक आहे. आजच्या पडझडीचा सगळ्यात जास्त फटका एलआयसीसह बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांना बसला.
श्री सिमेंटने दरवर्षी 1200 ते 1400 कोटींचा कर बुडवला असल्याचे बोलले जाते. बनावट करारपत्र करुन कंपनीने कर चुकवेगिरी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले. कंपनीच्या राजस्थानमधील बेवर, जयपूर, चित्तोडगढ, अजमेर या शहरांमध्ये धाडी टाकल्यानंतर करचोरी उघड झाली. आयकर विभागाकडून चौकशी सुरु असून सहकार्य करत असल्याचे श्री सिमेंटने शेअर बाजारांना कळवले आहे.
कर बुडवल्याच्या वृत्ताचे पडसाद आज शेअर मार्केटमध्ये उमटले. आज सकाळच्या सत्रात श्री सिमेंटचा शेअर 10.11% नी कोसळला आणि तो 22601.30 रुपयांपर्यंत खाली आला. दिवसअखेर श्री सिमेंटचा शेअर 23664.90 रुपयांवर बंद झाला. त्यात 5.89% घसरण झाली.
सलग सहाव्या सत्रात श्री सिमेंटचा शेअर घसरला आहे. आजची घसरण मागील तीन वर्षातील सर्वात मोठी घसरण ठरली.
म्युच्युअल फंड आणि 'एलआयसी'ला 2500 कोटींचा फटका
- सिमेंट उद्योगातील मोठी कंपनी म्हणून श्री सिमेंटचा लौकिक आहे.
- श्री सिमेंटमध्ये एलआयसीसह 22 म्युच्युअल फंड कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. या कंपन्यांची श्री सिमेंटमध्ये 6.88% हिस्सेदारी आहे.
- श्री सिमेंटमध्ये 492 परदेशी गुंतवणूकदारांनी 11631 कोटींची गुंतवणूक केली आहे.
- किरकोळ गुंतवणूकदारांची श्री सिमेंटमध्ये 1.93% हिस्सेदारी आहे. आज किरकोळ गुंतवणूकदारांचे 177 कोटींचे नुकसान झाले.
- आजच्या पडझडीनंतर एलआयसी आणि म्युच्युअल फंड कंपन्यांना जवळपास 2500 कोटींचा फटका बसला.
- एलआयसी देशातील सर्वात मोठी स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदार आहे. एलआयसीने श्री सिमेंटमध्ये 3.81% शेअर्स आहेत. आज श्री सिमेंटचा शेअर गडगडल्याने एलआयसीला 351 कोटींचा फटका बसला.