परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढत असल्याने शेअर मार्केटमध्ये सध्या तेजीचे वातावरण आहे. आज सोमवारी 15 मे 2023 रोजी सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी वाढ झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स 317 अंकांच्या वाढीसह 62345.71 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 84 अंकांच्या तेजीसह 18398.80 अंकांवर स्थिरावला. शेअर निर्देशांकाची मागील पाच महिन्यांतील ही उच्चांकी कामगिरी आहे.
घाऊक बाजारात महागाईचा दर कमी झाला आहे. जुलै 2020 नंतर महागाई पहिल्यांदाच कमी झाल्याने त्याचे पडसाद शेअर बाजारात उमटले. याशिवाय रियल्टी, एफएमसीजी, पीएसयू या क्षेत्रातील बड्या कंपन्यांची तिमाही कामगिरी दमदार राहिली.तिमाही कामगिरी सरस करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सला आज बाजारात मागणी दिसून आली.
आजच्या सत्रात बीएसई सेन्सेक्समधील 23 शेअर तेजीसह वधारले तर 7 शेअरमध्ये घसरण झाली. यात टाटा मोटर्स, आयटीसी, टेक महिंद्रा, एचयूएल, एलअँडटी, इन्फोसिस, टाटा स्टील, महिंद्रा, विप्रो, एसबीआय, एनटीपीसी, पॉवरग्रीड, भारतीएअरटेल, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक या शेअरमध्ये वाढ झाली. नेस्ले, बजाज फिनसर्व्ह, सनफार्मा, एशियन पेंट्स, टीसीएस, बजाज फायनान्स, मारुती या शेअरमध्ये घसरण झाली.
शेअर मार्केटमधील तेजीमागे अनेक घटक कारणीभूत आहेत. महागाईचा दर कमी झाला आहे.यामुळेच आगामी पतधोरणात रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर वाढीला ब्रेक लावला जाईल, अशी शक्यता जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य विश्लेषक विनोद नायर यांनी व्यक्त केली. त्याशिवाय भारतीय बाजारांमध्ये परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे.तिमाही स्तरावर कॉर्पोरेट कंपन्यांची कामगिरी बहरत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी खरेदीवर भर दिल्याचे नायर यांनी सांगितले.
आजच्या सत्रात निफ्टीवर निफ्टी बँक्स निर्देशांकाने 44100 अंकांचा टप्पा ओलांडला. निफ्टी बँक्स सार्वकालीन उच्चांकाच्या समीप पोहोचला आहे. यात सर्वच बँकांचे शेअर वधारले. बंधन बँक, बँक ऑफ बडोदा, आयडीएफसी फर्स्ट, फेडरल बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, कोटक बँक, एयू बँक, आयसीआयसीआय बँक या शेअरमध्ये वाढ झाली.
आज 150 शेअर्सनी 52 आठवड्यातील उच्चांकी स्तर गाठला. यात प्रेस्टीज इस्टेट, एचपीसीएल, टायटन , व्हीएसटी टिलर्स, रेटगेन ट्रॅव्हल्स, सीजी पॉवर, एयू स्मॉल बँक या शेअरमध्ये वाढ झाली. याशिवाय झेंसर टेक्नॉलॉजी, एलगी इक्विपमेंट्स, ग्रेट इस्टर्न शिपिंग कंपनी, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, डीएलएफ, शोभा, गोदरेज प्रॉपर्टीज, ईपीएल या शेअरमध्ये 4% ते 9% वाढ झाली.
अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये घसरण
सुप्रीम कोर्टात अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी सुनावणी सुरु असल्याचे त्याचे पडसाद अदानी ग्रुपच्या शेअरवर उमटले. अदानी समूहाच्या शेअरला आज झळ बसली. अदानी समूहाने गैरप्रकार केला आहे की नाही याबाबत सुप्रीम कोर्ट तपासणी करणार असल्याचे गेल्या शुक्रवारी कोर्टाने म्हटले होते. त्यामुळे आज गुंतवणूकदारांनी अदानींच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री केली. अदानी एंटरप्राईसेस, अदानी पोर्ट, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी ट्रान्समिशन, अदानी पॉवर, अदानी विल्मर, अदानी टोटल गॅस, एनडीटीव्ही आणि अंबुजा सिमेंट या शेअरमध्ये घसरण झाली.