वर्ष 2022मधील सेन्सेक्स आणि निफ्टीची कामगिरी पाहिली तर हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी टेन्शन वाढवणारे ठरले. वर्षभरात सेन्सेक्स आणि निफ्टीने इतर देशांतील शेअर मार्केटच्या तुलनेत चमकदार कामगिरी केली, मात्र प्रत्यक्षात निर्देशांकामध्ये झालेल्या प्रचंड घसरणीने गुंतवणूकदारांचे तितकेच मोठे नुकसान झाले. जाणकारांच्या मते सेन्सेक्सचा परतावा हा बँकांच्या मुदत ठेवींच्या तुलनेत कमीच राहिला.
वर्ष 2022 मध्ये जगभरातील घडामोडींनी शेअर मार्केटवर मोठा प्रभाव टाकला. रशिया-युक्रेन युद्ध, क्रूड ऑईलच्या किंमतीत झालेली प्रचंड वाढ, महागाईचा भडका, अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हची व्याजदर वाढ याचे पडसाद मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात उमटले. याच वर्षात सेन्सेक्सने 50921 अंकांचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर गाठला. त्यानंतर त्याने पुन्हा झेप घेतली. सेन्सेक्सने 25% ची तेजी अनुभवली. तब्बल 12600 अंकांची भरपाई करुन सेन्सेक्स 63583 अकांचा सार्वकालीन उच्चांकी स्तर गाठला.
जवळपास 14 वेळा शेअर मार्केटमध्ये तेजीची लाट धडकली, ज्यात सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची वाढ अनुभवली. यात 15 फेब्रुवारी 2022 रोजी सेन्सेक्सने 1736 अंकांची झेप घेतली होती. याच महिन्यात 24 फेब्रुवारी 2022 हा दिवस गुंतवणूकादारांसाठी काळा दिवस ठरला. या दिवशी सेन्सेक्समध्ये 2702 अंकांची घसरण झाली होती.
कोव्हीड काळात तेजीत राहिलेल्या आयटी आणि फार्मा या क्षेत्रांनी वर्ष 2022 मध्ये सपशेल निराशा केली. ऊर्जा, कॅपिटल गुड्स, सार्वजनिक कंपन्या या क्षेत्रात तेजी दिसून आली. अदानी समूहाने वर्ष 2022 मध्ये गुंतवणूकदारांना मालामाल केले. शेअर बाजारात दाखल झालेल्या पेटीएमने मात्र गुंतवणूदारांना कंगाल केले. वर्षभरात परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमधून प्रचंड गुंतवणूक काढून घेतली. एफआयआयने जवळपास 1.2 लाख कोटी काढून घेतले. फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवल्याने एपआयआयने शेअर मार्केटमधून गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला.
निफ्टीतील बहुतांश सेक्टर्सनी केली दमदार कामगिरी
निफ्टी एनर्जी सेक्टरने वर्ष 2022 मध्ये 10.14% परतावा दिला. निफ्टी एनर्जी इंडेक्स 25395.20 अंकांपर्यंत वाढला. एक वर्षापूर्वी 26 डिसेंबर 2021 रोजी हा सेक्टर 22636.95 अंकावर होता. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टर इंडेक्समध्ये 9.66% वाढ दिसून आली. निफ्टी एफएमसीजी सेक्टर इंडेक्सने 20.05% तेजी दिसून आली. एक वर्षांपूर्वी 26 डिसेंबर 2021 रोजी हा इंडेक्स 37,579.55 अंकांवर होता. एका वर्षात तो 44,719.55 अंकांवर गेला.
निफ्टी आयटी इंडेक्सने मात्र गुंतवणूकदारांना जोरदार झटका दिला. मागील एका वर्षात निफ्टी आयटी इंडेक्स 25.16% घसरला, निफ्टी मिडिया इंडेक्समध्ये 15.04% घसरण झाली. निफ्टी रियल्टी आणि निफ्टी मेटल इंडेक्स देखील घसरले. निफ्टी मेटल इंडेक्समध्ये मागील एका वर्षात 5.24% घसरण झाली. निफ्टी रियल्टी सेक्टरमध्ये 14.13% घसरण झाली.