• 04 Oct, 2022 15:42

नोटा बदलण्यासाठी जाणून घ्या आरबीआयचे नियम!

Rbi

फाटलेल्या किंवा मळलेल्या नोटांची चिंता सोडा. अशा नोटा जवळच्या बँकेत बदलून मिळतील.

अनेक वेळा दुकानदार किंवा भाजीवाले जुनी किंवा थोडी फाटलेली नोट घेण्यास नकार देतात. अशा वेळी या फाटलेल्या किंवा मळलेल्या नोटांचा काय करायचा असा प्रश्न पडतो. या समस्येवर रिजर्व बँक ऑफ इंडियाने (RBI ) उपाय म्हणून काही नियम जाहीर केले आहेत. या नियमानुसार तुम्ही जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन असे पैसे बदलून घेऊ शकता. विशेष बाब म्हणजे बँका या नोटा बदलून घेण्यास नकार देऊ शकत नाहीत. आरबीआयच्या (RBI) नियमानुसार, एखाद्या बँकेने तुमच्या फाटलेल्या नोटा बदलून देण्यास नकार दिल्यास, त्याच्यावरही कारवाई होऊ शकते.

फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी नियम 

फाटलेल्या नोटा बदलून देण्यासाठी आरबीआयने (RBI) मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. फाटलेल्या चलनी नोटा देशातील कोणत्याही बँकेत बदलता येतात. मात्र, यासाठी काही अटी आहेत. नोट जितकी वाईट स्थितीत असेल तितकी तिची किंमत कमी होईल. 50 रुपयापेक्षा अधिक किंमत असलेल्या नोटा बदलायच्या असल्यास आणि नोटेचा 80 टक्के भाग चांगला असल्यास बँक पूर्ण रिफंड देते. फाटलेल्या नोटेचा 40 टक्क्यांहून मोठा भाग चांगला असल्यास त्याची अर्धी किंमत मिळेल. जर नोटेचा 40 टक्क्यांहून छोटा भाग असल्यास त्याचे रिफंड मिळणार नाही.

बँकेत नोट कशी बदलायची 

तुमची नोट तुकड्यांमध्ये फाटलेली असेल तर बँक बदलून देऊ शकते. एखाद्या नोटेचा भाग गायब असेल तर ती नोट तुम्ही सरकारी बँकेतून बदलून घेऊ शकता. जर नोट पूर्ण फाटलेली किंवा जळलेली असेल तर RBI च्या शाखेत जाऊन ती बदलावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला बँकेत एक फॉर्म भरावा लागणार आहे. RBI च्या नियमांनुसार, ज्या बँक फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी नकार देतील त्यांची तक्रार बँकिंग लोकपाल किंवा RBI च्या तक्रार पोर्टलवर करता येऊ शकते.

व्यवहार शुल्क भरावे लागणार

नियमांनुसार, जर तुमच्याकडे 20 पेक्षा जास्त फाटलेल्या नोटा असतील आणि त्यांची एकूण किंमत 5,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला नोटा बदलण्यासाठी व्यवहार शुल्क भरावे लागेल. नोट बदलण्यासाठी जाण्यापूर्वी, त्यावर गांधीजींचे वॉटरमार्क, राज्यपालांचे चिन्ह आणि अनुक्रमांक यांसारखी सुरक्षा चिन्हे असायला हवीत. जर तुमच्याजवळ फाटलेल्या नोटेत ही सर्व चिन्हे असतील तर बँकेला नोट बदलावी लागेल.

अनेक तुकड्यांमध्ये विभागल्यावरही बदलण्याची सुविधा

आरबीआयने (RBI)अनेक तुकड्यांमध्ये विभागलेल्या नोटा बदलण्याचे नियम तयार केले आहेत. त्या बदलून नवीन नोटा मिळण्याच्या प्रक्रियेला थोडा वेळ लागू शकतो. यासाठी तुम्हाला या नोटा आरबीआयच्या शाखेत पोस्टाद्वारे पाठवाव्या लागतील. यामध्ये तुम्हाला तुमचा खाते क्रमांक, शाखेचे नाव, IFSC कोड, नोटची किंमत याविषयी माहिती द्यावी लागेल.

फाटलेल्या नोटेसंदर्भात RBI चा हा नियम जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला या गोष्टीचं टेन्शन येणार नाही. अगदी तुम्हाला सेलोटेप चिकटवलेली नोट जरी मिळाली तरी ती तुम्ही बदलून घेऊ शकता.