Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Petrol diesel price : पेट्रोल-डिझेल स्वस्त नाहीच, सौदी अरेबियाच्या निर्णयानं कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ

Petrol diesel price : पेट्रोल-डिझेल स्वस्त नाहीच, सौदी अरेबियाच्या निर्णयानं कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ

Petrol diesel price : सौदी अरेबियाकडून भारतासाठी एक नकारात्मक बातमी आहे. सातत्यानं वाढणारे पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्याची आशा आता धुसर झालीय. ओपेक प्लसच्या झालेल्या बैठकीत भारताला मोठा झटका बसलाय. सौदी अरेबियानं घेतलेल्या निर्णयानं इंधन दरवाढ कमी होण्याची शक्यता नसल्याचं स्पष्ट झालंय.

नुकतीच ओपेक प्लसची (Opec plus) बैठक झाली. या बैठकीत सौदी अरेबियानं जुलैपासून दररोज दहा लाख बॅरल उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच उर्वरित ओपेक प्लस देश 2024च्या शेवटी उत्पादनात कपात करतील. या निर्णयानंतर आता कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ (Crude oil price hike) झालीय. त्यामुळे भविष्यात भारतात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त मिळण्याच्या शक्यतेला पूर्णविराम मिळणार असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, तेल विपणन कंपन्यांना इंधनाचे दर (Fuel price) वाढवावे लागणार नाहीत.  

जागतिक मागणी काय?

सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री अब्दुलअजीज बिन सलमान यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, की हा आमच्यासाठी मोठा दिवस आहे. बैठकीत जी काही सर्वसहमती झाली ती कौतुकास्पद आहे. उत्पादनासाठी जे टार्गेट सेट केले आहेत ते अधिक पारदर्शक आणि न्याय्य आहेत. तेलाच्या घसरलेल्या किमतींमुळे अमेरिकन चालकांना त्यांच्या टाक्या अधिक स्वस्तात भरण्यास मदत झालीय. जगभरातल्या ग्राहकांनादेखील महागाईपासून थोडासा दिलासा मिळाला आहे. येत्या काही महिन्यांत इंधनाच्या मागणीतली अनिश्चितता लक्षात घेता आणखी कपात गरजेची आहे, असं सौदी अरेबियाला वाटलं. अमेरिका आणि युरोपमधली आर्थिक स्थिती नाजुक पाहायला मिळत आहे. सोबतच कोविड-19 निर्बंधांमध्ये दिलासा दिल्यानंतरही चीनकडून मागणी अपेक्षेप्रमाणं होताना दिसत नाही, असं ते म्हणाले.

सौदी ओपेक तेल कार्टेलमधला मुख्य उत्पादक

सौदी अरेबिया हा ओपेक तेल कार्टेलमधला मुख्य उत्पादक आहे. ओपेक सदस्यांपैकी एक आहे ज्यांनी एप्रिलमध्ये 1.16 दशलक्ष बॅरल प्रतिदिन यावर सहमती दर्शविली होती. यात सौदी अरेबियाचा वाटा 5,00,000 होता. त्यानंतर यूएसमधल्या मध्यावधी निवडणुकीच्या एक महिना आधी दररोज 2 दशलक्ष बॅरल कमी करेल, अशी घोषणा ओपेक प्लसनं ऑक्टोबरमध्ये केली. तथापि, या कपातीमुळे तेलाच्या किमतींना चिरस्थायी चालना मिळाली. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 87 डॉलरवर वधारले. मात्र काही दिवसांनी किंमत प्रति बॅरल 75 डॉलरपर्यंत खाली आली. यूएस क्रूड 70 डॉलरच्या खाली आले.

अर्थव्यवस्था सुधारण्यावर सौदीचा भर

सौदी अरेबिया आपल्या अर्थव्यवस्थेत विविधता आणण्यात गुंतल्याचं दिसून येतंय. आपली कमाई फक्त तेलावर अवलंबून ठेवायची नाही, हे सौदीनं ठरवलंय. सोबतच विविध विकास प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यासाठी तेलाच्या माध्यमातून चांगला महसूल गरजेचा आहे. त्यामुळे तेलाच्या उत्पादनात कपात करून भाव वाढवण्याचा सौदीचा प्रयत्न असणार आहे. आयएमएफच्या मते, सौदी अरेबियाला आपल्या कॅपेक्सची पूर्तता करण्यासाठी तेलाची किंमत सुमारे 81 डॉलर प्रति बॅरल असणं गरजेचं आहे. मात्र बऱ्याच काळापासून ते प्रति बॅरल 75 ते 77 डॉलरवर व्यापार करताना दिसत आहे.

भारताचं मात्र नुकसान

लोकसंख्येचा विचार करता भारत हा जगातला तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. रशियाकडून सध्या भारत स्वस्त तेल खरेदी करत आहे. मात्र तरीदेखील सौदी अरेबियाकडून घेण्यात येणाऱ्या तेलाचं प्रमाणही काही कमी नाही. अशा परिस्थितीत ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमती वाढवणं भारतासाठी चांगलं नाही. यामुळे भारताचा आयात आणि एकूण खर्चच वाढणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होतील, या शक्यतांना धक्का बसेल. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 80 डॉलरच्या पुढे गेली तर भारतासाठी इंधनाच्या किंमती कमी करणं अवघड जाणार आहे.