रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेला 5.39 कोटींचा दंड ठोठावला आहे. ग्राहकांच्या ओळखपत्रांसंबधी (KYC) नियमांचे पालन न केल्याने आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकेवर कारवाई केली. पेटीएम पेमेंट बँक ही पेटीएम कंपनीची उपकंपनी आहे.
पेमेंट्स बँका आणि नागरी सहकारी बँका तसेच वाणिज्य बँकांना ग्राहकांसंबधीची माहिती अद्ययावत आणि नियमांची पूर्ततेसह ठेवणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बँकेकडून याबाबत अचानक परिक्षण केले जाते. यात काही त्रुटी आढळल्यास आरबीआय संबधित बँकांवर दंडात्मक कारवाई करते.
पेटीएम पेमेंट्स बँकेबाबत ग्राहकांच्या केवायसी नियमातील त्रुटींबरोबरच पेमेंट बँकेच्या परवान्याशी संबधित नियमांचा भंग झालेला आढळून आला. त्याशिवाय सायबर सुरक्षेविषयीची प्रणाली आणि यूपीआय यंत्रणेबाबत त्रुटी आढळून आल्याने कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
केवायसी आणि मनी लॉंडरिंग प्रतिबंधात्मक यंत्रणेसंबधी रिझर्व्ह बँकेकडून पेटीएम पेमेंट्स बँकेचे परिक्षण करण्यात आले होते. यात पेटीएम पेमेंट्स बँकेला त्यांचे खातेदार असलेल्या कंपन्यांचे बेनिफिशिअल ओनर सिद्ध करण्यासंबधीचे कागदपत्र सादर करता आले नाहीत. बँकेतून होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर पेटीएम बँकेची देखरेख नसल्याने जोखीम वाढली असल्याचे रिझर्व्ह बँकेने निवेदनात म्हटले आहे.
पेआऊट सेवा वापरणाऱ्या काही निवडक ग्राहकांच्या बाबतीत पेटीएम पेमेंट्स बँकेने दिवसअखेरची शिलकीबाबतच्या नियमांचा भंग केल्याचे परिक्षणात निदर्शनात आढळून आले. त्यानुसार पेटीएम पेमेंट्स बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेवर 5.39 कोटींची दंडात्मक कारवाई केली.