इलेक्ट्रिक टू व्हीलरमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या ओला इलेक्ट्रिक कंपनीला IPO चे वेध लागले आहेत. तब्बल 5 बिलियन डॉलर्स अर्थात 40000 कोटींची मार्केट व्हॅल्यू असणाऱ्या ओलाने IPO साठी मर्चंट बँकर्सची निवड केली आहे. वर्ष 2023 अखेर ओला इलेक्ट्रिकचा IPO बाजारात धडकण्याची शक्यता आहे.
सॉफ्टबँक आणि टायगर ग्लोबल या बड्या गुंतवणूकदारांनी ओला इलक्ट्रिकमध्ये गुंतवणूक केली आहे. देशात विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक स्कुटर्समध्ये ओलाची सर्वाधिक विक्री होते.वेगाने वाढणाऱ्या या कंपनीने भांडवली गरज पूर्ण करण्यासाठी शेअर मार्केटमध्ये आयपीओ योजना आणण्याची तयारी सुरु केली आहे.
ओला इलेक्ट्रिकच्या आयपीओबाबत आज काही प्रमुख वृत्तसंस्थांनी वृत्त जाहीर केले आहे. त्यानुसार ओला इलेक्ट्रिकने IPO साठी गोल्डमन सॅक्स आणि कोटक महिंद्रा बँक या दोन बँकांची निवड केली आहे. लवकरच कंपनीकडून सुधारित मूल्यांकन आणि आयपीओचे आकारमान जाहीर केले जाणार आहे.
वर्ष 2022 मध्ये ओलाने शेवटची निधी उभारणी केली होती तेव्हा कंपनीचे बाजार मूल्य 5 बिलियन डॉलर्स इतके होते. त्यामुळे आगामी आयपीओसाठी कंपनी किमान 10% हिस्सा विक्री करण्याची शक्यता आहे. मार्केट व्हॅल्यूएशनुसार ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ हा देशातला सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता आहे.
वर्ष 2021 मध्ये ओलाने इलेक्ट्रिक स्कुटर्सची निर्मिती सुरु केली होती. दोन वर्षात कंपनीने इलेक्ट्रिक स्कुटर्सची बाजारपेठ काबीज केली आहे.आयपीओनंतर कंपनी इलेक्ट्रिक मोटारसायकर आणि इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनामध्ये विस्तार करण्याची शक्यता आहे.. RBSA अॅडव्हायझर्स या संस्थेच्या मते वर्ष 2030 मध्ये भारतातील इलेक्ट्रिक व्हेईकलची बाजापपेठ 150 बिलियन डॉलर्स इतकी वाढणार आहे. त्यामुळे कंपनीने आयपीओची तयारी सुरु केली आहे.
येत्या दोन वर्षातआणखी मॉडेल्स बाजारात आणणार
ओला इलेक्ट्रिकने वर्ष 2022 मध्ये तब्बल 1.5 इलेक्ट्रिक स्कुटरची विक्री केली आहे. ओलाने सप्टेंबर 2021 मध्ये भारतात पहिली इलेक्ट्रिक स्कुटर बाजारात लॉंच केली होती. सध्या कंपनीच्या S1, S1 Pro आणि S1 Air ही तीन मॉडेल्स बाजारात आहे. यांची किंमत 84999 रुपयांपासून आहे. S1 ला पूर्ण चार्ज होण्यासाठी सरासरी 4 तास 30 मिनिटांचा अवधी लागतो. ही स्कुटर 90 किमी प्रती तास या वेगाने धावू शकते. येत्या दोन वर्षात कंपनी इलेक्ट्रिक स्कुटरची आणखी मॉडेल्स बाजारात आणणार आहे. त्याशिवाय कंपनी लिथियम आयन बॅटरीच्या निर्मितीमध्ये देखील उतरणार आहे.
'ओला इलेक्ट्रिक'चे वर्चस्व
ओला इलेक्ट्रिकने विजेवर धावणाऱ्या स्कुटर्सच्या बाजारात अल्पावधीतच वर्चस्व निर्माण केले आहे. या मार्केटमध्ये ओला इलेक्ट्रिक झपाट्याने विस्तार करत आहे. आजच्या घडीला कंपनीची भारतभर 400 सेंटर्स आहेत.नजिकच्या काळात दररोज 50 सेंटर्स सुरु करण्याचे कंपनीचे नियोजन आहे. एप्रिल महिन्यात ओला इलेक्ट्रिकने 30000 स्कुटर्सची विक्री केली. आजवरची ही सर्वाधिक विक्री होती. यापूर्वी ओलाने डिसेंबर 2022 या महिन्यात 25000 स्कुटरची विक्री केली होती. ओला सरकारच्या कोणत्याही अनुदानाशिवाय व्यावसायिक वृद्धीसाठी सज्ज असल्याचे कंपनीचे प्रमुख भावेश अगरवाल यांनी म्हटले होते.