इलेक्ट्रिक स्कुटर्स विक्रीतील आघाडीची कंपनी ओला स्कुटर्सच्या आयपीओबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. शेअर मार्केटमध्ये लवकरात लवकर लिस्ट होण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न वाढवण्यात आले आहेत. एका रिपोर्टनुसार ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ ऑक्टोबर महिनाअखेर शेअर मार्केटमध्ये धडक देईल, अशी शक्यता आहे.
ओला इलेक्ट्रिककडून 700 मिलियन डॉलर्सचा आयपीओ प्रस्ताव सेबीकडे सादर केला जाण्याची शक्यता आहे. ओला इलेक्ट्रिकचे सध्याचे बाजारमूल्य 5.4 बिलियन डॉलर्स इतके आहे.
ओला इलेक्ट्रिकने आयपीओसाठी कोटक महिंद्रा बँक, आयसीआसीआय बँक, बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच आणि गोल्डमन सॅक्स या इन्व्हेस्टमेंट बँकर्सशी करार केला आहे. या बँकांना ओलाकडून आयपीओबाबत एक गोपनीय मेल पाठवण्यात आल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.
या गोपनीय मेलनुसार ओला इलेक्ट्रिकच्या आयपीओसाठी प्रोजेक्ट हिमालय असा कोडवर्ड ठेवण्यात आला आहे. हा प्रोजेक्ट सध्या सर्वोच्च प्राधान्यक्रमावर असल्याने बँकांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.
ओला इलेक्ट्रिक जरी स्कुटर्स विक्रीमध्ये आघाडीवर असली तरी कंपनी तोट्यातच आहे. ओला इलेक्ट्रिकचा ई स्कुटर्स मार्केटमध्ये 30% हिस्सा आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुरास आर्थिक वर्ष 2023 अखेर ओला इलेक्ट्रिकला 136 मिलियन डॉलर्सचा तोटा झाला होता. कंपनीला याच वर्षात 335 मिलियन डॉलर्सचा महसूल मिळाला होता.