वर्षभरापासून दूध व दुग्धजन्य पदार्थ महाग होत आहे. या महागाईचा दर 6.5 टक्के इतका आहे. गेल्या पाच महिन्यात दूध महागाईने उसळी घेतली आहे. महागाईचा दर 8.5 टक्के इतका वाढला आहे. वाढत्या महागाईने सामान्यांच्या खिशाला झळ बसली आहे.
एम्के ग्लोबल सर्व्हिसेस (Emkay Global Financial Services) या संस्थेच्या अहवालानुसार दुधाच्या किमतीत गेल्या सहामाहीत मोठी वाढ झाली आहे. वाढती मागणी व तुलनेने पुरवठा कमी असल्यामुळे दुधाचे दर आणखी काही महिने वाढतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. वार्षिक महागाई लक्षात घेता दुधाचा महागाईचा दर 6.5% पर्यंत पोहोचला आहे.
दूध दरवाढीचे कारणे? (Reason Behind Milk Price Hike)
दुधाच्या दारवाढीचे कारण अनेकप्रकारे मोजले जात आहे. देशभरात कोरोनाचे संकट तसेच मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने दूध महाग झाल्याचे प्रमुख कारण मानले जाते. चारा व पशुखाद्याच्या किमतीत देखील मोठी वाढ बघायला मिळत आहे. या सर्व गोष्टींचा दुधाच्या उत्पादन खर्चावर परिणाम झाला आहे. पशुखाद्याच्या किंमतीत मागील वर्षभरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जनावरांना सांभाळताना त्यांना पशुखाद्यावर मोठा खर्च करावा लागत आहे.
फेब्रुवारी 2021पासून चाऱ्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. कोविडनंतर उत्पादन व उत्पन्न यात झालेली घट हा सर्वात महत्वाचा घटक आहे. या काळात हॉटेल्स, मिठाईची दुकाने विवाह सोहळे या ठिकाणी दुधाची मागणी कमी झाल्यामुळे दुधाचे दर कोसळले होते. यामुळे दुधापासून तयार करण्यात येणारे पदार्थ जसे की, तूप,पनीर व मावा यांच्या किमतीतही मोठी घट पाहायला मिळाली होती.
शेतकऱ्यांनी केली गुरांच्या संख्येत कपात (Farmers Reduced the Number of Cattle)
एकीकडे चारा आणि पशुखाद्याचा वाढता खर्च आणि दूध दरात घट झाल्यामुळे शेतकऱ्यांनी काटकसर करत गुरांच्या संख्येत कपात केली होती. या काळात गुरांना आहार कमी मिळाल्यामुळे या गुरांच्या दूध देण्याच्या क्षमतेत घट झाली.यामुळे सर्वत्र दुधाचा पुरवठा कमी होऊ लागला. कोविड काळात गायींचे पुरेसे पोषण न झाल्यामुळे दुधाचे उत्पादन कमी झाले. दुसऱ्या बाजूला गेल्या तीन वर्षात भारताच्या दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीतही लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामुळे देशात दुधाची टंचाई वाढली आहे.
गोवर्धन आणि अमूलची दरवाढ
देशातील मोठ्या 2 खासगी दूध कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यात दूध दरात भाववाढ केली होती. उत्पादन खर्च वाढल्यामुळे ही भाववाढ करत असल्याचे कंपन्यांनी म्हटले होते. गोवर्धन ब्रँडने 2 फेब्रुवारीपासून दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ केली होती. गोवर्धन गोल्ड दुधाची किंमत 56 रुपये प्रति लिटर इतकी आहे. गोवर्धन मुंबईत दररोज 2.5 लाख लिटर गायीच्या दुधाची विक्री करतात. अमूलने गाईच्या दूध दरात प्रतिलिटर तीन रुपयांपर्यंत वाढ जाहीर केली. अमूल गोल्ड 66 रुपये प्रति लिटर, अमूल फ्रेश 54 रुपये प्रति लीटर, अमूल गायीचे दूध 56 रुपये प्रति लिटर आणि अमूल म्हशीचे दूध 70 रुपये प्रति लीटर असेल. अमूलने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रतिलिटर दोन रुपयांनी दरवाढ केली होती.
(News Source : Economic Times)