कंडोम उत्पादक मॅनकाइंड फार्माचा आयपीओ 15 पटीने सबस्क्राईब झाला आहे. यामुळे ग्रे मार्केटमध्ये मॅनकाइंड फार्माच्या शेअरमध्ये तेजी आहे. मॅनकाइंड फार्माकडून 3 मे रोजी शेअरचे वाटप केले जाणार आहे.
कंपनी शेअर विक्रीतून 4326 कोटींचे भांडवल उभारणार आहे. या आयपीओसाठी कंपनीला 15 पट अधिक बोली प्राप्त झाली आहे. कंपनीचा आयपीओ 25 ते 27 एप्रिल 2023 या काळात गुंतवणुकीसाठी खुला झाला होता. यासाठी प्रती शेअर 1026 ते 1080 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.
संस्थात्मक गुंतवणूदारांनी 49.16 पट बोली लावली आहे. उच्च उत्पन्न गटातील गुंतवणूकदारांकडून राखीव शेअर्सपैकी 3.8 पट बोली लावण्यात आली. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव शेअर्सपैकी 92% शेअर्ससाठी अर्ज करण्यात आले आहेत. IPO साठी कंपनीकडे 42.95 कोटी शेअर्सची बोली लागली आहे.
मॅनकाइंडचे 8 मे 2023 रोजी होणार लिस्टींग
मॅनकाइंड फार्माचा शेअर 8 मे 2023 रोजी बीएसई आणि एनएसई या दोन्ही शेअर बाजारात लिस्ट होणार आहे. त्यापूर्वी आयपीओसाठी अर्ज केलेल्या गुंतवणूकदारांना 3 मे 2023 रोजी मॅनकाइंडकडून शेअरचे वाटप केले जाणार आहे. या भाग्यवान गुंतवणूकदारांना 5 मे रोजी डिमॅट खात्यात शेअर ट्रान्सफर केले जातील. ज्यांना डिमॅट खात्यात शेअर प्राप्त होणार नाहीत, अशा गुंतवणूकदारांना 4 मे रोजी बँक खात्यात पैसे परत केले जातील.
ग्रे मार्केटमध्ये शेअरचा भाव वधारला
आयपीओला मिळालेला प्रतिसाद पाहता मॅनकाइंड फार्माच्या शेअरला ग्रे मार्केटमध्ये मागणी असल्याचे दिसून आले आहे. आज 29 एप्रिल 2028 रोजी ग्रे मार्केटमध्ये मॅनकाइंडचा शेअर इश्यू प्राईसच्या तुलनेत 3 ते 5% प्रीमियमवर ट्रेड करत आहे. कंपनीने इश्यू प्राईस 1080 रुपये प्रती शेअर इतकी ठेवली आहे.
असा चेक करा अॅलॉटमेंट स्टेटस
मॅनकाइंड फार्माचा अॅलॉटमेंट स्टेटस खालील पद्धतीने चेक करता येईल. मॅनकाइंड फार्माच्या आयपीओसाठी केफिन टेक ही कंपनी रजिस्टार म्हणून काम करत आहे. या कंपनीच्या वेबसाईटवरुन गुंतवणूकदारांना शेअर अॅलॉटमेंट स्टेटस चेक करता येऊ शकतो. त्याचबरोबर बीएसईच्या वेबसाईटवर देखील मॅनकाइंड फार्माचा अॅलॉटमेंट स्टेटस चेक करता येऊ शकतो.
- केफिनटेकच्या वेबसाईटवर जा
- IPO ची निवड करा. Mankind Pharma IPO
- तुमचा अॅप्लिकेशन नंबर, डिमॅट अकाउंट नंबर आणि पॅनकार्ड सादर करा
- कॅप्चा कोड सादर करुन सबमिट करा.
मुंबई शेअर बाजाराच्या वेबसाईटवरुन स्टेटस चेक करा
- इश्यूचा प्रकार आणि इश्यूचे नाव निवडा
- अॅप्लिकेशन नंबर आणि पॅन नंबर सादर करा
- कॅप्चा क्लिक करुन तपासा