महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा कंपनीने प्रायव्हेट सेक्टरमधील कर्ज देणारी RBL Bank मध्ये गुंतवणूक वाढवण्याच्या निर्णयावर गुंतवणूकदारांना नाराजी व्यक्त केल्याचे दिसून येते. परिणामी गुरूवारी (दि. 27 जुलै) महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा कंपनीच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांनी घसरण झाल्याचे दिसून आले.
महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा कंपनीने आरबीएल बँकेत (RBL Bank) जवळपास 10 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्याच्या निर्णयाचा महिन्द्रा कंपनीली चांगलाच फटका बसला आहे. यामुळे सकाळच्या सत्रात महिन्द्राचा शेअर 7 टक्क्यांनी 1,438.80 रुपयांवर आला होता. मात्र त्याचवेळी आरबीएल बँकेच्या शेअर्समध्ये जवळपास 3 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले. आरबीएलच्या शेअर्सचा कालचा भाव पाहता आज त्यामध्ये बऱ्यापैकी वाढ झाल्याचे दिसून येते.
महिन्द्रा कंपनीने स्टॉक एक्सचेंज दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने आरबीएल बँकेमध्ये 417 कोटी रुपयांची गुंतवणूक करून 3.53 भाग खरेदी केले आहेत. दरम्यान महिन्द्रा समुहात महिन्द्रा फायनान्स (Mahindra Finanve NBFC) कंपनीसुद्धा आहे. या कंपनीच्यावतीने RBL मधील 10 टक्के हिस्सा खरेदी करण्याचा कंपनीचा विचार आहे. पण कोणत्याही बँकेतील 5 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त हिस्सा खरेदी करायचा असेल, तर त्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगी गरजेची असते.
काही दिवसांपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजने रिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस (Jio Financial Services-JFSL)ला वेगळे करून नवीन व्यवसायाची संधी निर्माण केली. यातून जिओ ग्राहकांसाठी आणि लहान-मोठ्या व्यावसायिकांसाठी कर्जाच्या वेगवेगळ्या योजना आणणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा कंपनीच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
महिन्द्रा कंपनीने आरबीएलमधील आपला हिस्सा 10 टक्क्यांपर्यंत नेला तर, महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा कंपनी ही RBL मधील सर्वात मोठी भागधारक कंपनी ठरेल. दरम्यान, महिन्द्रा कंपनीने भविष्यातील आपली योजना अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे येणाऱ्या दिवसात महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा कंपनी आरबीएलमध्ये किती आणि कशाप्रकारे गुंतवणूक करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आरबीएल बँकेची मालकी कोणाकडे?
RBL Bank हिचे नाव Ratnakar Bank Limited असून ही एक खाजगी बँक आहे. या बँकेची स्थापना 1943 मध्ये झालेली आहे. मार्च, 2022 पर्यंत हिच्या 28 राज्यांमध्ये 502 शाखा असून 414 एटीएम आहेत. सध्या बँकेचे मार्केटमधील भांडवल जवळपास 146.27 अब्ज रुपये इतके आहे. सांगलीतील बाबगोंडा भुजगोंडा पाटील आणि कोल्हापूरचे गंगाप्पा सिद्दाप्पा चौगुले यांनी या बँकेची सुरूवात केली होती. सध्या विश्वैर अहुजा हे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आहेत.