सध्या दिल्लीच्या चांदणी चौकातील छोले-भटुरे विकणारा आणि मुंबईतील बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या बाहेर फळांची विक्री करणारा विक्रेता सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत? आता तुम्ही म्हणाल यात नवीन ते काय? कारण सोशल मिडियावर असे व्हायरल होणारे बरेच आहेत. पण या दोघांची खासियत काही औरच आहे. हे दोन्ही विक्रेते पैसे स्वीकारण्यासाठी डिजिटल रुपीचा (Digital Rupee) वापर करत आहेत. आरबीआयने 5 शहरांमधून जे 5 हजार व्यापारी निवडले आहेत; त्यात या दोघांचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वी महिन्द्रा अॅण्ड महिन्द्रा कंपनीचे संचालक आनंद महिन्द्रा हे बीएसईमध्ये एका मिटिंगमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी आवर्जून या फळविक्रेत्याला भेट दिली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्याच पद्धतीने आरबीआयने स्थानिक पातळीवरील काही विक्रेत्यांना हाताशी धरून सीडीबीसीचा प्रायोगिक वापर करण्यास सुरूवात केली. यातून आरबीआय डिजिटल रुपीचे टेस्टिंग करत आहे. क्रिप्टोकरन्सीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या बजेटमध्ये (Budget 2023) सरकार क्रिप्टोवर काहीतरी भाष्य करेल, अशी अपेक्षा होती. पण बजेटमध्ये किंवा बजेटच्या भाषणात यावर अर्थमंत्र्यांकडून काहीच भाष्य करण्यात आले नाही. पण त्यापूर्वी आरबीआयकडून डिजिटल रुपी (Digital Rupee) घोषणा करण्यात आली होती. त्याची टेस्टिंग आरबीआयकडून सुरू आहे.
आरबीआयने डिसेंबरपासून पहिल्या डिजिटल करन्सीचे टेस्टिंग सुरू केले आहे. ज्याचा हळुहळू संपूर्ण भारतात सराईतपणे व्यवहार केला जाईल, अशी अपेक्षा आहे. यासाठी या शॉप्समध्ये सीडीबीसी स्वीकारण्यासाठी इतर पेमेंट स्वीकारण्यासाठी जसे क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. तसेच सीडीबीसी स्वीकारण्यासाठी वेगळे क्यूआर कोड लावले आहेत. सध्या सीडीबीसीचा वापर खूपच मर्यादित प्रमाणात होत असून दिवसभरात फक्त 2 किंवा 3 व्यवहार होत आहेत.
Table of contents [Show]
सीडीबीसीबाबत संभ्रम आणि उत्सुकता...
सीडीबीसी काय आहे? त्याचा वापर कसा करायचा? तसेच ते आपल्याला मिळवायचे असतील तर कसे मिळवायचे? त्यासाठी कोणते अॅप वापरले जाते? असे अनेक प्रश्न लोकांना पडत आहे. सध्या लोक वेगवेगळ्या प्रकारच्या डिजिटल पेमेंटला सरावले आहेत. पण सीडीबीसी किंवा डिजिटल रुपी हे वापरण्यासाठी नवीन माध्यम आहे. त्यामुळे लोकांमध्ये याच्या वापराबद्दल जेवढी उत्सुकता आहे; तेवढाच संभ्रम सुद्धा आहे. लोकांमधील हे संभ्रम दूर करण्यासाठी आरबीआयचे अधिकारी प्रयत्न करत आहेत. त्यांना मार्गदर्शन करत आहेत. जसे की, डिजिटल रुपीचा वापर करायचा असेल तर कोणत्या प्रक्रियेचा वापर करावा लागेल.
डिजिटल रुपीचा वापर कसा करायचा?
डिजिटल रुपीचा वापर करून रोख रकमेशिवाय आर्थिक व्यवहार करता येणार आहेत. चेक किंवा ऑनलाईन पेमेंट (Online Payment) करताना आपल्याला बँकेची मदत घ्यावी लागते. पण डिजिटल रुपीमध्ये बँकेचा सहभाग नसणार आहे. डिजिटल रुपी ही देशाची अधिकृत करन्सी आहे आणि यावर आरबीआयचे पूर्णपणे नियंत्रण असणार आहे. यासाठी आपल्याला आरबीआयने निवडलेल्या बॅंकांच्या माध्यमातून डिजिटल रुपी आपल्या वॉलेटमध्ये घ्यावा लागणार आहे. त्यानंतरच त्याचा वापर करता येणार आहे.
डिसेंबरपासून डिजिटल करन्सीचा वापर सुरू
प्रायोगिक तत्त्वावर सीडीबीसीचा वापर डिसेंबर, 2022 पासून सुरू करण्यात आला आहे. सध्या फक्त 5 शहरे, 50 हजार वापरकर्ते आणि 5 हजार व्यापारी हे या प्रायोगिक उपक्रमाचा भाग आहेत. तसेच भारतातील सर्वांत मोठी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडिया (State Bank of India-SBI)सह इतर 7 बॅंकांचा यात समावेश करण्यात आला आहे. आरबीआय सध्या डिजिटल रुपीचा वापर करणाऱ्यांकडून, व्यापाऱ्यांकडून माहिती घेत आहे.
डिजिटल रुपी काय आहे?
डिजिटल रुपी याचे मूळ नाव सीबीडीसी म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी असे आहे. ही सीबीडीसी करन्सी आरबीआय (Reserve Bank of India-RBI) द्वारे जारी करण्यात आलेल्या चलनी नोटांचे एक डिजिटल रूप आहे. या चलनाला आरबीआयने कायदेशीर मान्यता दिली आहे आणि सर्वांत महत्वाच म्हणजे ही भारताची क्रिप्टोकरन्सी नाही.
जगभरातील सुमारे 115 देश सीबीडीसीचा वापर करण्याच्या तयारीत आहेत. तर 60 देश यामध्ये पूर्णपणे उतरले असून ते सीबीडीसीच्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचले आहेत. तसेच G20मधील सुमारे 18 देशांनी सीडीबीसीचा वापर करण्याची तयारी केली आहे. त्यातील 7 देशांनी पायलट प्रोजेक्ट म्हणून याचा वापर करण्यास सुरूवात केली आहे, अशी माहिती आरबीआयकडे उपलब्ध आहे.