Cyber Crime: तुम्ही अनेदका घरातून बाहेर पडतांना आपला मोबाइल चार्जिंग करणे विसरता किंवा तुमचे मोबाइल चार्जर सोबत घेऊन जाणे विसरता. मग मोबाइलची बॅटरी डाऊन होताच तुम्ही पब्लिक प्लेस वर आपला मोबाइल चार्जिंग करता आणि याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेतात. जर तुम्ही पुन्हा असे करणार असाल, तर सावध व्हा. कारण, पब्लिक प्लेसवर तुमचा मोबाइल चार्ज करे पर्यंत तुमच्या मोबाइल मधला महत्वाचा डेटा हॅकर्स ने हॅक केलेला असतो आणि दुसरीकडे तुमचे बँक खाते पूर्णपणे रिकामे झालेले असते. अशा प्रकारचे गुन्हे करण्याकरीता गुन्हेगार रेल्वे स्टेशन, बस स्थानक, विमानतळ यासारखे गर्दीचे स्थळ शोधतात. ज्यूस जॅकिंग स्कॅमबाबत नागरिकांनी सतर्क राहावे, यासाठी आरबीआयने नागरिकांना सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत.
कसे घडते ज्यूस जॅकिंग स्कॅम
ज्यूस जॅकिंग स्कॅम हा सायबर गुन्ह्याचा एक प्रकार आहे. ज्यात सायबर गुन्हेगार मोबाइल आणि लॅपटॉपसारख्या डिवाइसमधून नागरिकांचा महत्वपूर्ण डेटा चोरतात आणि मग त्यांचे आर्थिक नुकसान करतात. हा सगळा प्रकार करण्याकरीता सायबर गुन्हेगार सार्वजनिक चार्जिंग स्टेशन वर मालवेअर सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर चा वापर करतात. गुन्हेगार सार्वजनिक चार्जिंग स्टेशन वर यूएसबी पोर्ट किंवा चार्जिंग करणारे डिव्हाइस लावून इतर नागरिकांचा डेटा ट्रांसफर करुन घेतात. तसेच मालवेअर सॉफ्टवेअरचा वापर करुन इतरांचे इमेल, पासवर्ड, एसएमएसवर ताबा मिळवतात आणि डेटा चोरी करतात. एकदा जर बँकेसंदर्भातला डेटा गुन्हेगारांच्या हाती लागला, मग संबंधित व्यक्तीचे आर्थिक नुकसान केले जाते.
काय काळजी घ्यावी?
अशाप्रकारच्या सायबर गुन्ह्यांपासून स्वत:चा बचाव करण्याकरीता शक्यतोवर आपले डिव्हाइसेस आठवणीने घरुनच चार्जिंग करा. स्वत:ची चार्जिंग पॉवर बँक जवळ बाळगा. पॉवर बँक जवळ असल्यास तुम्हाला तुमचे डिव्हाइसेस इतरत्र चार्जिंग वर लावण्याची गरज भासणार नाही. सार्वजनिक ठिकाणी कुठेही आपले डिव्हाइसेस चार्जिंग करतांना Direct USB Charging वर लावण्या ऐवजी AC Socket वरच लावा. चार्जिंग करण्याकरीता कोणत्याही अनोळखी व्यक्तिच्या लॅपटॉप किंवा पॉवर बँकचा वापर करु नका. ज्या केबल ने केवळ मोबाइल चार्ज केल्या जातो, अशाच USB केबलचा वापर करा. तसेच उत्तम दर्जाच्या अँटीवायरसचा वापर करा.