प्रधानमंत्री जन धन बँक खाते तुमच्यापैकी अनेकांनी सुरु केले असेल. सुरुवातीला सरकारने असे बँक खाते सुरु करण्यास का सांगितले असा सगळ्यांना प्रश्न होता. मात्र 2014 साली सुरु झालेल्या या योजनेचा सर्व भारतीयांनी लाभ घेतला असून नागरिकांना आता बचतीची सवय देखील लागली असल्याचे मत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केले आहे.
सामन्यांची बँकेशी ओळख
खेड्यापाड्यात राहणाऱ्या नागरिकांना बँक कसे काम करते? त्याचे फायदे काय आहेत? बँक खाते कसे उघडले जाते? याबद्दल माहिती नव्हती. 2014 साली नागरिकांना मिळणारी सरकारी मदत प्रधानमंत्री जन धन बँक खात्यात टाकली जाईल असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. तसेच नागरिकांनी त्यांच्या नजीकच्या बँकेत जाऊन ‘जन धन बँक योजनेत’ शून्य रुपये शिल्लक असलेले खाते (Zero Balance Account) सुरु करावे असे सांगण्यात आले.
2 लाख कोटींहून अधिक रक्कम जमा
केंद्र सरकारच्या या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातील नागरिकांनी बँकेत खाते खोलले आणि त्यानिमित्ताने त्यांना बँकेचा कारभार कसा चालतो ते देखील कळले. ही योजना (PMJDY) देशात आर्थिक समावेशकता आणण्याचे सर्वात मोठे माध्यम म्हणून उदयास आली आहे असे मत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केले आहे.
कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह 2023 (Kautilya Economic Conclave) मध्ये उपस्थितांना संबोधित करताना अर्थमंत्र्यांनी ही माहिती दिली. प्रधानमंत्री जन धन बँक खात्याचा उपयोग 50 पेक्षा जास्त सरकारी योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यासाठी केला गेला असेही त्या म्हणाल्या.
50 कोटी बँक खात्यांमध्ये 2 लाख कोटींहून अधिक रक्कम जमा झाल्याची माहिती देखील अर्थमंत्र्यांनी दिली.
बचतीची लागली सवय
बँक खाते सुरु झाल्यामुळे नागरिकांना त्यांच्याकडे असलेले पैसे कुठे कुठे खर्च होत आहेत याची माहिती घेणे सोपे झाले आहे. तसेच बँक खाते सुरु झाल्यामुळे बँकेशी संबंधित विविध सरकारी योजनांची माहिती देखील नागरिकांना मिळू लागली आहे. अर्थविश्वात सामान्य नागरिकांची सर्वसमावेशकता आणण्यात सरकारच्या प्रयत्नांना यश आल्याचे देखील अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.