शेअर मार्केटमधील आयपीओ लिस्टिंग (IPO Listing) संदर्भात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. सेबीने (SEBI) घेतलेल्या निर्णयानुसार यापुढे आता आयपीओ खरेदी बंद झाल्यानंतर संबंधित कंपनीचा शेअर केवळ तीन दिवसातच लिस्ट होणार आहे. सेबीच्या या निर्णयानुसार 1 सप्टेंबरपासून येणारे सर्व IPO 3 दिवसात सूचीबद्ध होणार आहेत.
28 जूनला घेतला होता निर्णय
आयपीओ संदर्भात सेबीने घेतेलल्या निर्णयानुसार आता आयपीओ बंद झाल्यानंतर कंपनीचे शेअर्स शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याची अंतिम मुदत बदलली आहे. यासाठी 28 जून 2023 ला सेबीच्या संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत आयपीओ लिस्टिंगचा (IPO Listing)कालावधी कमी करण्याबाबत सल्लामसलत करून निर्णय घेण्यात आला. यामध्ये 2 टप्पे करण्यात आले होते. त्यानुसार यापुढे कंपन्यांना 1 सप्टेंबरपासून IPO बंद झाल्यानंतर तो पुढील 3 दिवसात सूचीबद्ध करावा लागेल. हा निर्णय ऐच्छिक ठेवण्यात आला आहे. मात्र, 1 डिसेंबर 2023 पासून ज्या शेअर मार्केटमध्ये जे आयपीओ दाखल होतील त्यां कंपन्यांना मात्र 3 दिवसात आयपीओ लिस्ट करणे अनिवार्य राहिल.
यापूर्वी होता 6 दिवसांचा कालावधी-
शेअर मार्केटमध्ये एखाद्या कंपनीचा आयपीओ दाखल झाल्यानंतर 3 ते 5 दिवस आयपीओ खरेदी करण्याचा कालावधी असतो. हा कालावधी संपल्यानंतर म्हणजे आयपीओ बंद झाल्यापासून कामाकाजाच्या 6 दिवसानंतर संबंधित कंपनीचा आयपीओ लिस्टिंग केला जात असे. मात्र आता सेबीच्या या नव्या नियमानुसार कंपनीला यापुढे 3 दिवसांमध्ये आपला आयपीओ लिस्टिंग करावा लागणार आहे.