भारतात मत्स्यपालन उद्योग एकेकाळी मच्छीमारांपुरता मर्यादित होता.परंतु आज तो एक यशस्वी आणि प्रतिष्ठित लघु उद्योग म्हणून प्रस्थापित होत आहे. सरकारच्या नील क्रांती ते अर्थ क्रांती या बदलत्या धोरणांमुळे मत्सव्यवसायाला आर्थिक उत्पादनाच्या दृष्टीने सध्या सुगीचे दिवस आल्याचे दिसून येत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाने या क्षेत्रात क्रांती आणली आहे. मासेमारी केवळ रोजगाराच्या संधी निर्माण करत नाही तर खाद्याचा पुरवठा वाढवण्याबरोबरच परकीय चलन मिळवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आज भारत एक प्रमुख मासे उत्पादक देश म्हणून उदयास येत आहे. त्याशिवाय भारताने आर्थिक वर्ष 2022-23मध्ये सी फूडची (समुद्री खाद्य- मासे, खेकडे, कोळबी..इ) विक्रमी नियार्त केली आहे.
64 हजार कोटींची निर्यात-
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताने सीफूड निर्यातीमध्ये आत्तापर्यंतचा उच्चांक गाठला असल्याची माहिती केंद्रीय मत्स्य विभागाकडून देण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 च्या तुलनेत FY2023 मध्ये भारताने निर्यातीमध्ये 26.73% आणि मूल्याच्या बाबतीत 4.31% वाढ केली आहे. आर्थिक वर्ष 23 मध्ये आत्तापर्यंतचे सर्वोच्च 17,35,286 टन सीफूडची निर्यात झाली आहे. या माध्यामातून सुमारे 64 हजार कोटीची कमाई केली आहे.
अमेरिका मोठा आयातदार देश-
भारतीय सीफूड 120 देशांमध्ये निर्यात केले जाते, ज्यामध्ये अमेरिका सर्वात मोठा आयातदार आहे. अमेरिका ही गोठवलेल्या कोळंबीची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. यानंतर चीन, युरोपियन युनियन, दक्षिण-पूर्व आशिया, जपान आणि पश्चिम आशियातील देशांचा समावेश आहे. भारताने फ्रोझन कोळंबीच्या निर्यातीमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
मत्स्य उत्पादनात दुपटीने वाढ
भारताने 2013-14 च्या तुलनेत आत्तापर्यंतची सी फूडची ही निर्यात दुपटीने वाढली आहे. वर्ष 2013-14 मध्ये समुद्री खाद्य पदार्थांची निर्यात ही 30,213 कोटी होती. तीच निर्यात 2022-23 या वित्त वर्षात 63,969.14 कोटी रुपये झाली आहे. मागील नऊ वर्षांमध्ये भारताचे वार्षिक मत्स्य उत्पादन 95.79 लाख टन (2013-14 अखेर) वरून 162.48 लाख टन (2021-22 अखेर) पर्यंत वाढले आहे. त्यात 66.69 लाख टनांची वाढ दिसून येत आहे. शिवाय, 2022-23 या वर्षासाठी राष्ट्रीय मत्स्य उत्पादन देखील अंदाजे 174 लाख टन होण्याची अपेक्षा आहे.
मच्छिमारांसाठी किसान क्रेडिट कार्ड
सरकारने 2018-19 या आर्थिक वर्षापासून मच्छीमार आणि मत्स्यशेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) सुविधेचा विस्तार केला आहे. ज्यामुळे त्यांना त्यांच्या खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यात मदत होत आहे. आत्तापर्यंत मच्छिमार आणि मत्स्यशेती करणाऱ्यांना 1,42,458 KCC कार्ड जारी करण्यात आले आहेत. यामाध्यमातून मत्स्य उत्पादक अथवा मच्छिमारांना 3 लाखांपर्यंतचे भांडवल उपलब्ध करून दिले जाते.
एमपीईडीए (MPEDA)च्या माध्यामातून निर्यातीस प्राधान्य -
समुद्री मच्छिमारी करणाऱ्या मत्स्यव्यवासायिकांना भारत सरकारच्या समुद्री उत्पादन आणि निर्यात विकास प्राधिकरण (MPEDA) यांच्याकडून सीफूड निर्यातीसाठी सुविधा पुरवल्या जातात. परदेशात भारतीय सीफूड निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी MPEDA आंतरराष्ट्रीय मेळ्यांमध्ये सहभाग घेते. निर्यातीला चालना देण्यासाठी, MPEDA जगातील प्रमुख आंतरराष्ट्रीय सीफूड मेळ्यांमध्ये भाग घेते आणि सीफूड बद्दलचे मार्केटिंग करते. त्याच बरोबर MPEDA व्यावसायिक शिष्टमंडळांना भारत भेट देण्यास मदत करते आणि व्यावसायिक संबंध मजबूत करण्यासाठी प्रमुख सीफूड खरेदी करणाऱ्या देशांमध्ये शिष्टमंडळ पाठवते.