एलईडी इंटिग्रेटेड लाइटिंग सोल्यूशन्स सुविधा देणाऱ्या आयकिओ लायटिंगच्या (IKIO Lighting)शेअरला ग्रे मार्केटमध्ये मागणी दिसून आली आहे. ग्रे मार्केटमध्ये IKIO Lighting चा शेअर 40% प्रीमियमवर ट्रेड करत आहे. त्यामुळे आयपीओची जबरदस्त लिस्टींग होण्याची शक्यता शेअर बाजार विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
आयकिओ लायटिंग (IKIO Lighting IPO) आयपीओच्या माध्यमातून 600 कोटी रुपयांचे भांडवल उभारणार आहे.प्राइज बँडच्या बाबतीत कंपनीचं मूल्य 2200 कोटी रुपये आहे. यामध्ये 350 कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जाणार आहेत. कंपनीचा आयपीओची गुरुवारी 8 जून 2023 रोजी मुदत संपली. आयकिओ लायटिंगचा इश्यू 163.88 पटीने सबस्क्राईब झाला आहे. सर्वच श्रेणीतील गुंतवणूकदारांनी शेअर खरेदीसाठी प्रचंड अर्ज सादर केले आहेत.
ग्रे मार्केटमध्ये कंपनीचा शेअर 125 ते 130 रुपये प्रीमियमसह ट्रेड करत आहे. कंपनीने आयपीओसाठी प्रती शेअर 270 ते 285 रुपयांचा किंमतपट्ट निश्चित केला आहे. मात्र ग्रे मार्केटचा प्रतिसाद पाहता शेअर मार्केटमध्ये तो गुंतवणूकदारांना चांगला परतावा देईल, असे बोलले जात आहे. आयकिओ लायटिंगचा शेअर किमान 399 रुपयांना लिस्ट होण्याची शक्यता आहे.
आयकिओ लायटिंगच्या आयपीओपैकी 50% हिस्सा क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्ससाठी राखीव आहे.15% नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्ससाठी तर 35% रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी राखीव आहे.येत्या 16 जून 2023 रोजी बीएसई (BSE) आणि एनएसईवर (NSE) शेअर्सची लिस्टिंग होणार आहे.गुंतवणूकदारांना 13 जून रोजी शेअर्सचं अलॉटमेंट म्हणजेच वाटप होणार आहे. केफिन टेक या आयपीओचे रजिस्ट्रार आहेत.
आयकिओ लायटिंग आयपीओच्या माध्यमातून पैसे उभारुन गुंतवणूक करणार आहे. याशिवाय 50 कोटी रुपयांचा वापर कर्जाची परतफेड करण्यासाठी केला जाईल,असे कंपनीने म्हटले आहे. 212.31 कोटी रुपयांचा वापर नोएडामध्ये नवीन सुविधा उभारण्यासाठी केला जाईल. उर्वरित निधी सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरला जाणार आहे. यापूर्वी कंपनीने अॅंकर गुंतवणूकदारांकडून 181.95 कोटी उभारले होते.
आयकिओ लायटिंग एलईडी इंटिग्रेटेड लाइटिंग सोल्यूशन्स सुविधा देणारी कंपनी आहे. कंपनीचा नोएडामध्ये 3 आणि उत्तराखंडमध्ये एक प्लान्ट आहे. उत्पादनं डिझाइन करणं आणि विकणं हे कंपनीचं काम आहे. आर्थिक वर्ष 2020मध्ये कंपनीला 21.41 कोटींचा नफा झाला होता.2021मध्ये 28.81 कोटी रुपये आणि 2022मध्ये 50.52 कोटी रुपये नफा कंपनीनं कमावला.