ड्रोन उत्पादनातील स्टार्टअप्स असलेल्या आयडियाफोर्जच्या समभाग विक्री योजनेला गुंतवणूकदारांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. गुरुवारी 28 जून रोजी हा आयपीओ 50.3 पटीने सबस्क्राईब झाला. आयपीओतून कंपनी 46 लाख शेअर्स इश्यू करणार आहे. मात्र गुंतवणूकदारांनी तब्बल 23 कोटी 38 लाख शेअर्ससाठी बोली लावली आहे. त्यामुळे आता लिस्टींगवेळी आयडियाफोर्जचा शेअर किती फायदा मिळवून देतो याकडे शेअर बाजार विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.
शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार आयडिया फोर्जचा आयपीओ शेवटच्या दिवशी गुरुवारअखेर 50.3 पटीने सबस्क्राईब झाला आहे. यात किरकोळ गुंतवणूकदारांसाठीचा राखीव हिस्सा 64.48 पटीने सबस्क्राईब झाला असून कर्मचाऱ्यांसाठीचा राखीव हिस्सा 66.99 पटीने सबस्क्राईब झाला आहे.
या समभाग विक्री योजनेत 13112 शेअर्स सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात आले आहे. प्रत्येक शेअरवर 32 रुपयांची सवलत देण्यात येणार आहे. कंपनीकडून 4 जुलै 2023 रोजी शेअरचे वाटप होण्याची शक्यता आहे. बीएसई आणि एनएसई या दोन्ही शेअर बाजारात हा शेअर लिस्ट होणार आहे.
हाय नेटवर्थ गटातील गुंतवणूकदारांनी देखील या आयपीओला चांगला प्रतिसाद दिला आहे. या नेटवर्थ गटासाठी शेअर्सचा राखीव हिस्सा 64.06 पटीने सबस्क्राईब झाला आहे. अर्थात एका शेअर्ससाठी 64 जणांनी बोली लावली आहे.
आयडियाफोर्ज समभाग विक्रीतून 567 कोटी उभारणार आहे. आयपीओसाठी कंपनीने प्रती शेअर 638 ते 672 रुपये असा किंमत पट्टा निश्चित केला आहे. गुंतवणूकदारांना 29 जून 2023 पर्यंत आयपीओसाठी अर्ज करता येणार आहे. गुंतवणूकदारांना किमान 22 शेअर्ससाठी अर्ज करता येईल.
ग्रे मार्केटमध्ये आयडियाफोर्जची डिमांड वाढली
IPO खुला होण्यापूर्वीच ग्रे मार्केटमध्ये आयडियाफोर्जच्या शेअरने धुमाकूळ घातला आहे. आयडियाफोर्जचा शेअर ग्रे मार्केटमध्ये प्रचंड तेजीत आहे. आयपीओतील इश्यू प्राईसच्या तुलनेत सध्या आयडिया फोर्जचा शेअर 672 रुपये प्रीमियमसह ट्रेड करत आहे. IPO प्राईसच्या तुलनेत ग्रे मार्केटमध्ये आयडियाफोर्जचा भाव 80% जास्त आहे.