Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IdeaForge Technology Listing: आयडियाफोर्जच्या शेअरची भरारी, पहिल्याच दिवशी 94% नफा, तज्ज्ञांनी दिला 'हा' सल्ला

IdeaForge IPO

IdeaForge Technology Listing: आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजीच्या समभाग विक्री योजनेला गुंतवणूकदारांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. त्यामुळे ग्रे मार्केटमध्ये आयडियाफोर्जचा प्रीमियम 75% ने वाढला होता. आयपीओला मिळालेला प्रतिसाद पाहता आयडियाफोर्जची बंपर लिस्टींग होणार हे स्पष्ट झाले होते.

ड्रोन उत्पादनातील स्टार्टअप्स असलेल्या आयडियाफोर्जच्या शेअरने बीएसई आणि एनएसईवर पहिल्याच दिवशी भरारी घेतली आहे. आज शुक्रवारी आयडियाफोर्जचा शेअरने शेअर मार्केटमध्ये शानदार एंट्री घेतली. एनएसईवर तो इश्यू प्राईसच्या तुलनेत 94% प्रीमियमसह 1300 रुपयांना सूचीबद्ध झाला. बीएसईवर आयडियाफोर्जच्या शेअरची 1305.10 रुपयांवर लिस्टींग झाली. गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी जबरदस्त फायदा झाला आहे. त्यामुळे प्रॉफिट बुक करायचे कि या शेअरमध्ये आणखी काही दिवस राहायचे याबाबत तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना सल्ला दिला आहे.

आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजीच्या समभाग विक्री योजनेला गुंतवणूकदारांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. त्यामुळे ग्रे मार्केटमध्ये आयडियाफोर्जचा प्रीमियम 75% ने वाढला होता. आयपीओला मिळालेला प्रतिसाद पाहता आयडियाफोर्जची बंपर लिस्टींग होणार हे स्पष्ट झाले होते.

आयडियाफोर्ज समभाग विक्रीतून 567 कोटी उभारले आहेत. आयपीओसाठी कंपनीने प्रती शेअर 638 ते 672 रुपये असा किंमत पट्टा निश्चित केला आहे. मात्र आज शुक्रवारी दोन्ही शेअर बाजारात कंपनीचा शेअर प्रत्यक्षात 1300 रुपयांच्या पातळीवर लिस्ट झाला.

राष्ट्रीय शेअर बाजारात आज आयडियाफोर्ज कंपनीच्या प्रवर्तकांच्या उपस्थित लिस्टींग झाली. एनएसईवर घंटानाद करुन शेअरचे लिस्टींग करण्यात आले. आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजीचा शेअर एनएसईवर 1300 रुपयांवर लिस्ट झाला. त्याने इश्यू प्राईसच्या तुलनेत 93.5% वाढीसह शेअर बाजारात प्रवेश केला. अशाच प्रकारे मुंबई शेअर बाजारात (बीएसई) आयडियाफोर्जने 1305.10 रुपयांवर एंट्री घेतली. तिथेही गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी 93.5% नफा मिळाला आहे.

आयपीओमध्ये 13112 शेअर्स सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात आले होते. प्रत्येक शेअरवर 32 रुपयांची सवलत देण्यात आली. हाय नेटवर्थ गटातील गुंतवणूकदारांनी देखील या आयपीओला चांगला प्रतिसाद दिला आहे. या नेटवर्थ गटासाठी शेअर्सचा राखीव हिस्सा 64.06 पटीने सबस्क्राईब झाला होता.  

आयडियाफोर्जच्या बंपर लिस्टींगने आयपीओमध्ये शेअर प्राप्त झालेल्या भाग्यवान गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. दरम्यान, याबाबत स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टच्या इक्विटी रिसर्च हेड अनुभूती मिश्रा यांनी गुंतवणूकदारांना प्रॉफिट बुक करण्याचा सल्ला दिला आहे.

आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजीची अपेक्षेप्रमाणे नोंदणी झाली आहे. ज्यांना शेअर प्राप्त झाले होते. त्यांनी नफा बुक करुन बाहेर पडावे, असे मिश्रा यांनी सांगितले. शेअरची कामगिरी दमदार आहे. मात्र कंपनीच्या व्यवसायाचा विचार केला तर भविष्यात या व्यवसायाबाबत जोखीम देखील जास्त आहे. त्यामुळे ज्यांना नफा कमवायचा असेल त्यांनी आता यातून बाहेर पडणे योग्य राहील. जे आक्रमक रणनिती आजमावतात त्यांनी 1170 रुपयांच्या स्टॉपलॉससह या शेअरमध्ये कायम राहू शकतात, असा सल्ला मिश्रा यांनी दिला.

अशाच प्रकारे मेहता इक्विटीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत तापसे यांनीही आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजीमध्ये नफा बुक करण्याचा सल्ला दिला आहे. लिस्टींगनंतर कंपनीच्या एकूण मूल्यांकनावर दबाव आहे. त्यामुळे आताच नफा कमावून बाहेर पडणे योग्य राहील, असे तापसे यांनी म्हटले आहे.

ड्रोन उद्योगाबाबत सरकारने अनेक कायदे केले आहेत. यात ड्रोन उत्पादकांना पीएलआय योजनेचा लाभ देणे, आयातीवर पूर्ण बंदी आणणे तसेच स्थानिक पातळीवर ड्रोनचा वापर सुरळीत करण्याबाबत व्यापक धोरण तयार केले जात आहे.