आरबीआयच्या नवीन नियमानुसार आता व्हिडिओ केवायसीची सुविधा देशातील काही बँकांनी देऊ केल्या आहेत. यामुळे वयोवृध्द खातेधारकांना आणि पेन्शनधारकांना घरातूनच केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होणार आहे. एवढेच नाही तर आजारी आणि अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांना, अपंग व्यक्तींना देखील या सुविधेचा लाभ मिळणार आहे.
नुकतेच सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा (BoB) ने व्हिडिओ री-केवायसी सेवा सुरू केली आहे. याद्वारे, ग्राहकांना त्यांच्या बँकेच्या शाखेत न जाताही केवायसी संबंधित ऑपरेशन्स पूर्ण करण्यासाठी पर्यायी सुविधा मिळेल.
कुणाला करता येईल व्हिडिओ केवायसी प्रोसेस?
व्हिडिओ KYC सुविधेचा वापर फक्त बँकेच्या वैयक्तिक खातेदारांना करता येणार आहे. ज्यांचे संयुक्त खाते आहे त्यांना प्रत्यक्ष बँकेत जाऊनच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तसेच 18 वर्षांपेक्षा कमी वयोमान असलेले विद्यार्थी किंवा पाल्यांचे व्हिडिओ केवायसी होऊ शकणार नाहीये, त्यांना देखील त्यांच्या बँकेच्या नजीकच्या शाखेत जाऊन हे काम करावे लागणार आहे. कारण ज्यांच्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आहे अशाच बँक खातेदारांचे केवायसी केले जाणार आहे.
काय आहे प्रोसेस?
पहिल्या टप्प्यात, ग्राहकांना त्यांच्या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन केवायसीसाठी अर्ज करावा लागेल. ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर, बँक कर्मचारी व्हिडिओ कॉल करून केवायसी प्रक्रिया पूर्ण करतील. त्यासाठी आधी ग्राहकांना सूचना देण्यात येईल. यादरम्यान खातेदारांनी स्वतःजवळ आपले पॅनकार्ड, एक पांढरा कागद आणि निळा किंवा काळ्या रंगाचा पेन सोबत ठेवावा.
बँक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन तुम्हांला करावे लागेल. तुमची सही आणि अन्य डीटेल्स तुम्हाला पांढऱ्या कागदावर लिहावे लागेल आणि व्हिडियो कॉल दरम्यान ते सादर करावे लागतील. यासाठी ग्राहकांनी त्यांचे इंटरनेट कनेक्शन सुरळीत आहे याची खात्री करून घ्यायची आहे.
बँक ऑफ बडोदाने जारी केलेल्या निवेदनानुसार, कोणत्याही कार्यालयीन दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत ग्राहकांना केवायसी कॉल केले जातील. व्हिडिओ केवायसी पूर्ण झाल्यानंतर, ग्राहकाचे तपशील बँकेच्या रेकॉर्डमध्ये अपडेट केले जातील. याबाबतची माहिती खातेधारकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे आणि मेलद्वारे कळवण्यात येईल.