Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Go First Collapsed: 'गो फर्स्ट एअर'पूर्वी भारतातील 'या' प्रमुख एअरलाईन्सनी आर्थिक बेशिस्तीमुळे गाशा गुंडाळला होता

Airlines

Go First Collapsed: डोईजड कर्जे आणि पुरवठादारांची देणी थकवणारी ‘गो फर्स्ट’ ही पहिलीच भारतीय विमान कंपनी नाही. कंपन्यांचे प्रवर्तक आणि व्यवस्थापनाच्या आर्थिक बेशिस्तीमुळे किंगफिशर एअरलाईन्स आणि जेट एअरवेज यासह अनेक एअरलाईन्सला यापूर्वी बिझनेस गुंडाळावा लागला होता.

कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर भारतातील हवाई क्षेत्र सावरत असतानाच आघाडीची कंपनी 'गो फर्स्ट' एअरलाईन आर्थिक संकटात सापडल्याचे वृत्त धडकले आणि एव्हिएशनमध्ये एकच खळबळ उडाली. 'गो फर्स्ट'वर तब्बल 11463 कोटींचे कर्ज आहे. दैनंदिन सेवा देण्यासाठी कंपनीकडे पैसेच शिल्लक नसल्याने गो फर्स्ट एअरने दोन दिवसातील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागले. डोईजड कर्जे आणि पुरवठादारांची देणी थकवणारी ‘गो फर्स्ट’ ही पहिलीच भारतीय विमान कंपनी नाही. कंपन्यांचे प्रवर्तक आणि व्यवस्थापनाच्या आर्थिक बेशिस्तीमुळे किंगफिशर एअरलाईन्स आणि जेट एअरवेज यासह अनेक एअरलाईन्सला बिझनेस गुंडाळावा लागला होता. 

किंगफिशर एअरलाईन्स

भारतातील लो कॉस्ट कॅरियर म्हणून नावारुपाला आलेल्या किंगफिशर एअरलाईन्समुळे हजारो कर्मचारी देशोधडीला लागले. किंगफिशर ग्रुपचे प्रमुख आणि माजी खासदार विजय मल्ल्या यांनी वर्ष 2005 मध्ये किंगफिशर एअरलाईन्स सुरु केली. 2007 मध्ये मल्ल्या यांनी एअर डेक्कन ही विमान कंपनी 1000 कोटी रुपयांना खरेदी केली होती. किंगफिशरकडे जवळपास 59 विमानांचा ताफा होता. लो कॉस्ट एअरलाईन्सच्या श्रेणीत दोन ते तीन वर्षातच किंगफिशर एअरलाईन्सने आपले वेगळे स्थान निर्माण केले. मात्र उत्पन्न जेमतेम आणि खर्च अवाढव्य यामुळे किंगफिशर एअरलाईन्सचा ताळमेळ बिघडला. विजय मल्ल्या यांनी कंपनीसाठी काढलेल्या कर्जाची रक्कम इतर ठिकाणी वापरली.  किंगफिशअर एअरलाईन्सचा तोटा प्रत्येक तिमाहीत वाढत गेला. इंधनाचे पैसे देण्यासाठी कंपनीकडे पैसे उरले नाहीत. विमानतळावर पार्किंगचे पैसे थकले. वर्ष 2012 मध्ये किंगफिशरची विमाने कायमची जमीनीवर उभी राहिली. कंपनी बंद झाली तेव्हा बँकांचे 9000 कोटींचे कर्ज थकले होते. यामुळे भारतीय स्टेट बँक, आयडीबीआय या  बँकांना मोठा आर्थिक फटका बसला. कर्ज वसुलीसाठी पुढे किंगफिशर एअरलाईन्सच्या स्थावर मालमत्तांचा लिलाव झाला. विजय मल्ल्या यांच्या संपत्तीवर जप्ती आली. अजून हे प्रकरण पूर्णपणे निकाली निघालेले नाही.

जेट एअरवेजचा डोलारा कोसळला

प्रिमीयम श्रेणीतील आघाडीची विमान कंपनी म्हणून जेट एअरवेजने हवाई प्रवाशांच्या मनावर अनेक वर्ष राज्य केले. मात्र आर्थिक शिस्तीचा अभाव आणि हवाई क्षेत्रातील स्पर्धेत टिकणे अवघड झाले आणि जेट एअरवेजचा डोलारा कोसळला. एप्रिल 2019 मध्ये जेट एअरवेजला आर्थिक संकटामुळे विमान सेवा बंद करावी लागली. जेट एअरवेज कंपनीला मागील काही वर्षांत मोठा तोटा सहन करावा लागला होता. या वाढत्या तोट्यामुळे कंपनीची विमान सेवा बंद पडली होती. दुबईस्थित उद्योजक मुरारी लाल जलान यांनी जेटसाठी बोली लावली. जेट एअरवेज विकत घेतल्यानंतर कंपनीची विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले मात्र अजूनही त्यात यश आलेले नाही.

एअर सहारा

सहारा परिवाराचे प्रमुख सुब्रता रॉय यांच्या मालकीच्या सहारा एअरलाईन्सला हवाई क्षेत्रात फारकाळ टिकणे अशक्य झाले. सहारा एअरलाईन्स ही 90 च्या दशकात वेगाने वाढणारी विमान कंपनी म्हणून उदयास आली होती. इतर विमान कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त तिकिटे आणि देशांतर्गत आणि इंटरनॅशनल कनेक्टिव्हीटीमुळे सहारा एअरलाईन्सचा प्रवास सुस्साट सुरु होता. मात्र वर्ष 2000 पासून सहाराच्या अडचणी वाढल्या. वर्ष 2006 मध्ये जेट एअरवेजने एअर सहारावर ताबा मिळवला.

एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्स

सरकारी विमान कंपनीला देखील कर्जाचा बोजा वाढल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. एअर इंडिया, इंडियन एअरलाईन्स या कंपन्यांना केंद्रातले मंत्री आणि सरकारी अधिकारी यांनी सवलतील केलेल्या प्रवासाने मोठा फटका बसला. याशिवाय खासगी कंपन्यांच्या दर्जेदार सेवेमुळे एअर इंडियाचे अनेक हवाई मार्ग तोट्यात चालत होते. ज्यामुळे कंपनीचा तोटा प्रचंड वाढला. सरकारने वेळोवेळी एअर इंडियाचे ब्रॅंडिंग करण्यासाठी प्रयत्न केले शेकडो कोटी खर्च केले मात्र संकटातून एअर इंडिया कधीच वर आली नाही.  पुढे एअर इंडियावरील कर्जाचा आकडा 18000 कोटींवर गेला. यामुळे केंद्र सरकारने एअर इंडियाचे खासगीकरण केले. टाटा समूहाने एअर इंडियाला खरेदी केले.

छोट्या विमान कंपन्या

चेन्नईतून पॅरामाउंट एअरलाईन्स ही 2005 मध्ये सुरु झाली होती. बिझनेस ट्रॅव्हलर्ससाठी ही कंपनी सेवा देत होती. मात्र पाच वर्षांनंतर कंपनी कर्जात सापडली आणि 2010 मध्ये कंपनी बंद झाली. त्यापूर्वी विद्युत एअरलाईन्स, एअर पेगासेस, एअर मंत्रा, एअर कार्निव्हल अशा विमान कंपन्यांनी भारतात कधीकाळी उड्डाणे घेतली होती. वर्ष दोन वर्षानंतर या कंपन्यांनी विमान सेवा बंद केली.