बँक कर्मचाऱ्यांच्या कामाचे दिवस कमी करण्यात यावेत अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. यासाठी बँकेच्या विविध कर्मचारी संघटनांनी आंदोलनाचा देखील पवित्रा घेतल्याचे तुम्ही पाहिले असेल. बँक कर्मचार्यांकडून कामकाजाचे दिवस आठवड्यातून 5 दिवस करण्याची मागणी केली जात आहे. या संदर्भात इंडियन बँकिंग असोसिएशनने एक प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे सादर केला आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास बँक कर्मचाऱ्यांना यापुढे प्रत्येक आठवड्यात शनिवार आणि रविवार अशा दोन दिवस सुट्ट्या मिळणार आहेत.
विविध बँक कर्मचारी संघटनांनी पाच दिवसांचा कामाचा आठवडा करावा आणि महिन्यातील शनिवार आणि रविवार या दिवशी कामकाजास सुट्टी द्यावी, अशी मागणी केली आहे. या सदंर्भात बँक व्यवस्थापनाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या इंडियन बँकिंग असोसिएशन (IBA) या संस्थेकडे निवेदन सादर करण्यात आले होते. यावर 28 जुलै रोजी झालेल्या बैठकीमध्ये आयबीएकडून (IBA) 5 दिवसांचा कामाचा आठवडा करण्यास सहमती दर्शवण्यात आली असल्याचे वृत्त द हिंदू बिझनेस लाईनने दिले आहे.
चारही शनिवारी सुट्टीची मागणी
सध्या बँकेचे सर्व व्यवहार हे डिजिटल झाले आहेत. यूपीआय, नेट बँकिंग यामुळे किरकोळ व्यवहारासाठी ग्राहकांची बँकेत होणारी वर्दळ कमी झाली आहे. त्यामुळे बँक कर्मचार्यांचा ताणही कमी झाला आहे. तसेच बँकेचे व्यवहार हे सर्व शासकीय सुट्ट्यांदिवशी बंद असतात. या शिवाय सद्यस्थितीत महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या शनिवारी बँक बंद असते. त्याच पार्श्वभूमीवर बँक कर्मचाऱ्यांकडून उर्वरित दोन शनिवारी देखील सुट्टी मंजुर करून कामकाजाचा आठवडा 5 दिवसांचा करण्याची मागणी केली जात आहे.
मंजुरीसाठी वित्त मंत्रालयाकडे
सर्व शासकीय आणि खासगी बँक कर्मचाऱ्यांच्या या मागणीनुसार बँकेच्या कामकाजाचा आठवडा हा 5 दिवसांचा करण्यासंदर्भात IBA ने केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे. जर अर्थ मंत्रालयाकडून या प्रस्तावास मंजुरी मिळाली तर या पुढे बँकेच्या शाखा आठवड्यातून फक्त पाच दिवस म्हणजेच सोमवार ते शुक्रवार सुरू राहणार आहेत. तसेच या प्रस्तावामध्ये दैनदिन कामकाजाची वेळ 45 मिनिटांनी वाढवली जाण्यासही बँकर्सकडून सहमती दर्शवण्यात आल्याची माहिती आहे.
ग्राहकांची अडचण होणार?
बँकेच्या कामकाजाबाबत बऱ्याच वेळा ग्राहकांच्या तक्रारी असतात. त्यातच बँकेचे व्यवहार हे शक्यतो 9.30 ते 3.50 या काळात सुरू असतात. मात्र, सद्य स्थितीतच कित्येक ग्राहक इतर कामासाठी व्यस्त असतात. अनेक खातेदारांचे कामकाजाचे दिवस आणि बँकेच्या कामकाजाचे दिवस सारखेच असतात. त्यामुळे बँकेच्या कामकाजाचे दिवस आणखी कमी झाल्यास ग्राहकांचीही अडचण होण्याची शक्यता आहे.